Coronavirus: उल्हासनगर महानगरपालिकेची मोठी कारवाई, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल 22 लाखांची वसूली
परंतु, तरीही काहीजण कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
कोरोनाचा (Coronavirus) वाढता धोका पाहता महाराष्ट्रात (Maharashtra) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, तरीही काहीजण कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. याचपाश्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने (Ulhasnagar Municipal Corporation) विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. उल्हासनगर महापालिकेने संचारबंदी असूनही विनामास्क फिरणाऱ्या 6 हजार 222 नागरिकांकडून 22 लाख 22 हजाराचा दंड ठोठावला आहे. यात सामान्य नागरिकांसह दुकानदारांचाही समावेश आहे. ही लोक बिनधास्त विनामास्क रस्त्यावरून फिरत होते. यासंदर्भात उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी माहिती दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गरजे शिवाय किंवा विनामास्क घराबाहेर पडू नका, असे आवाहन उल्हासनगर महापालिकेडून वारंवार करण्यात आले आहे. मात्र, तरीही काही नागरिक हलगर्जीपणाने वागताना दिसत आहेत. अशा नागरिकांना धडा शिकवण्यासाठी पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उल्हासनगर येथे 23 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत विनामास्क फिरणाऱ्या 898 नागरिकांवर कारवाई झाली. त्यानंतर मार्च महिन्यात चार हजार 195 विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावला गेला आहे. तर, एप्रिल महिन्याच्या 21 तारखेपर्यंत 1 हजार 127 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Corona Vaccination: शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोफत कोरोना लसीकरणाबाबतचे ट्विट केले डिलीट
महाराष्ट्रात आज 66 हजार 191 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 98 हजार 354 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.