अमरावती मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल B S Koshyari यांच्या विरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक; चप्पल दाखवत निषेध

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्यात आज सीमावाद प्रश्नी बैठक झाली.

Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (B S Koshyari )यांच्या महापुरूषांबद्दलच्या वादग्रस्त विधानांवरून सध्या वातावरण तापलेलं आहे. दिल्लीपासून गल्ली पर्यंत त्यांची यावरून चर्चा सुरू असताना आज अमरावतीमध्ये (Amaravati) ठाकरे गटाच्या शिवसेनेने रस्त्यावर उतरून त्यांचा निषेध केला आहे. राज्यपाल हटावची मागणी होत असताना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसले. त्यांनी चपला दाखवत राज्यपालांचा निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काहींना ताब्यातही घेतलं.

अमरावती मध्ये आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाप्रश्नांवर बैठकीसाठी आले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा दोन्ही राज्यांच्या राज्यापालांची अमरावतीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधनीत आज(24 डिसेंबर) महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीसाठी राज्यपाल जात असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी हातात चपला घेत राज्यपालांच्या वाहन ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले आणि ताब्यात घेतले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्यात ही बैठक आहे.

काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं राज्यपालांनी केली होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आता राज्यपालांना कोल्हापुरी चप्पल दाखवण्याची वेळ आली आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनातही महाविकास आघाडी कडून राज्यपाल हटावची मागणी केली होती.