Kirit Somaiya On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांसोबत नेमके काय संबंध आहेत जाहीर करावे- किरीट सोमय्या

कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना दोन कुटुंब एकत्र येतात आणि जमीनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करतात.त्यात आपल्या पत्नीचे नाव देतात यामागे नेमके कारण काय? याबाबत आम्ही माहिती घेतो आहोत, अर्थ समजून घेतो आहोत.

Kirit Somaiya | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांचे अन्वय नाईक (Anvay Naik) कुटुंबीयांशी काय संबंध आहेत ते जाहीर करावे अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकादा केली. उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा करत त्याअनुशंगाने त्यांनी काही कागदपत्रंही सोमय्या यांनी सादर केली. मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

किरीट सोमय्या यांनी या वेळी सांगितले की, आम्ही 21 सातबारा उतारे शोधून काढले आहेत. या या उताऱ्यांमध्ये ठाकरे आणि नाईक कुटुंबीयांमध्य जमीनीचे 21 व्यवहार झाले आहेत. आमच्या माहितीप्रमाणे हे 21 व्यवहार आहेत. असे आणखी किती व्यवहार झाले आहेत याबाबत चौकशी व्हावी आणि राज्याच्या जनतेला माहिती मिळावी, असेही सोमय्या म्हणाले. तसेच, उद्धव ठाकरे यांचा जमीनी खरेदी करायच्या आणि त्या विकायच्या असा काही व्यवसाय आहे का? ते रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात की गुंतवणूक म्हणून या जमीनी घेतल्या आहेत? याबाबत माहिती द्यावी असेही सोमय्या म्हणाले. (हेही वाचा, रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी संयुक्तपणे रायगडमध्ये अन्वय नाईक यांच्याकडून 2.20 कोटींची जमीन खरेदी केली; तर Arnab Goswamy ला लक्ष्य करण्याचं कारण काय? किरीट सोमय्या यांचा सवाल)

कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना दोन कुटुंब एकत्र येतात आणि जमीनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करतात.त्यात आपल्या पत्नीचे नाव देतात यामागे नेमके कारण काय? याबाबत आम्ही माहिती घेतो आहोत, अर्थ समजून घेतो आहोत. महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला हे जाणून घेण्याचा नक्कीच अधिकार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्यात नेमका संबंध काय आहे? त्यांच्या एकत्र येण्यामागे काय प्रयोजन आहे हा प्रश्न राज्याच्या जनतेला पडला असल्याचेही सोमय्या या वेळी म्हणाले.