'बुलेट ट्रेन'ला महाराष्ट्रात रोख? पहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रकल्पाबाबत
बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मात्र आता महाराष्ट्र सरकारकडून त्याला रोख लावण्यात येणार असे दिसत आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाची तुलना, पांढर्या हत्तीशी केली आहे. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मात्र आता महाराष्ट्र सरकारकडून त्याला रोख लावण्यात येणार असे दिसत आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, 'या प्रकल्पामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जेव्हा निर्माण होईल त्याचवेळी या प्रकल्पाचा निर्णय घेता येईल.' एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही बंद केले आहे.
रोजगाराचा हवाला देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'बुलेट ट्रेनच्या आगमनाने महाराष्ट्रात रोजगार वाढत असेल तरच राज्यात बुलेट ट्रेनसाठी परवानगी दिली जाईल. आम्ही आधी यावर चर्चा करू, त्यानंतरच निर्णय घेऊ.' शिवसेनेचे मुखपत्र सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी, 'बुलेट ट्रेन हे आमचे स्वप्न नाही, तो पांढरा हत्ती पाळायची काही गरज नाही. आम्ही याबद्दल जनतेचे मत घेऊ आणि मग काय करावे ते पाहू.' असेही वक्तव्य केले. (हेही वाचा: वचन मोडणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, आम्ही ते स्वीकारायला तयार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
त्यानंतर संजय राऊत यांनी, हा पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे लक्षात आणून दिले. त्यावर 'असेल, बरोबर आहे, पण हे ड्रीम प्रोजेक्ट जरी असले तरी जेव्हा जाग येते तेव्हा वस्तुस्थिती समोर असते. स्वप्न नसते,' असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. या योजनेवर बसून विचार करण्याची गरज आहे. बुलेट ट्रेनचा फायदा कोणाला होईल? यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळेल का? याचा विचार केला पाहिजे. अजूनही अनेक गावांतीत रस्ते खराब आहे, बुलेट ट्रेन आधी त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे असे ठाकरे सरकारला वाटत आहे.