Amol Kirtikar यांना लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर; संजय निरुपम यांनी आक्रमक होत केलं ट्वीट

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा भेटीमध्ये काल उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

Amol Kirtikar यांना लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर; संजय निरुपम यांनी आक्रमक होत केलं ट्वीट
Shiv Sena | Twitter

महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) अद्याप लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशात शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीची जागा घोषित करताच मुंबई मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) हे उत्तर पश्चिम (Mumbai North-West constituency) मुंबई लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे. मात्र त्यांच्या या घोषणेवर आणि अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवर कॉंग्रेसच्या संजय निरूपम यांनी आक्षेप घेतला आहे. ट्वीट करत त्यांनी 'खिचडी स्कॅम चे आरोप असलेले आणि ईडीच्या रडार वर असलेल्या एका घोटाळेबाज उमेदवाराचा कॉंग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रचार करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. Lok Sabha Elections 2024: शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांची लोकसभेची उमेदवारी भर सभेत केली जाहीर .

संजय निरूपम यांचा आक्षेप काय?

संजय निरूपम यांनी ट्वीट करत अद्याप मविआ च्या दोन डझन मिटींग होऊन देखील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना, 8-9 जागांबाबत निर्णय झालेला नसताना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करणं हे गटबंधन धर्माचं उल्लंघन नाही का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. अमोल कीर्तीकर हे कोविड काळात बीएमसी कडून वाटप करण्यात आलेल्या खिचडीच्या घोटाळ्यातील आरोपींपैकी एक आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना, ईडीची कारवाई सुरू असताना त्यांना उमेदवारी कशी दिली जाऊ शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'उरल्या सुरल्या शिवसेनेचे प्रमुख' असा केला आहे. त्यामुळे ही आघाडीत 'बिघाडी' असल्याची चर्चा रंगायला लागली आहे.

दरम्यान अमोल कीर्तीकर हे ठाकरे यांच्या निष्ठावंतांपैकी एक आहेत. वडील गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात सामील झाले असले तरीही अमोल हे ठाकरेंची साथ निभावत आहेत. युवासेना मध्ये अमोल कीर्तीकर सक्रिय होते. त्यानंतर आता त्यांना खासदारकीसाठी तिकीट जाहीर झाले आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा भेटीमध्ये काल उद्धव ठाकरे यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2024 01:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).