युती झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकत्र; 9 एप्रिलला औसा येथे सभेचे आयोजन
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेसाठी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत.
महाराष्ट्रात भाजप (BJP) आणि शिवसेना (shivsena) यांची युती झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या परीने प्रचाराला सुरुवात केली. नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात तीन सभा झाल्या आहेत. उद्धव ठाकरे पालघर जिल्ह्यात दौऱ्यावर होते त्यानंतर त्यांच्या पुढील सभांचे वेळापत्रक समोर आले. तर युती झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी एकत्र येणार आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेसाठी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत.
येत्या 9 एप्रिलला औसा येथे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी प्रचारसभेचे आयोजन केले आहे. याआधी हे दोन्ही नेते एकत्र यावेत म्हणून प्रयत्न झाले होते, मात्र हा योग जुळून आला नाही. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे. राम मंदिर, नोटबंदी, शेतकरी आत्महत्या, राफेल, शेतकरी कर्जमाफी अशा अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना जाब व प्रश्न विचारले आहेत. यामुळेच या दोन्ही पक्षातील दुरावा वाढला होता, मात्र युती झाल्यानंतर या दोन्ही पक्षांनी परत हातमिळवणी करत कोल्हापूर येथून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. (हेही वाचा: उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा धडाका; विदर्भ आणि मुंबईमध्ये 7 सभांचे आयोजन)
महाराष्ट्रात विदर्भमध्ये 10 जागा, मराठवाड्यात 8, उत्तर महाराष्ट्रात 6 आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथे प्रत्येकी 12 जागा आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे नेते पोहोचावे म्हणून दोघे स्वतंत्र सभा घेणार आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभांचा धडाका लावत विदर्भ आणि मुंबईमध्ये 7 सभांचे आयोजन केले आहे.