उदयनराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चा

यांच्या भेटीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी काही वेळातच याबाबत खुलासा होऊ शकतो.

Udayanraje Bhosale & CM Uddhav Thackeray (Photo Credits: PTI)

भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आज (17 फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) इतर मुद्द्यांवर अर्धा तास चर्चा केली. दरम्यान, राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत होते. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील भेट घेतली होती. तसंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती.

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. मराठा आरक्षणला स्थगिती मिळाल्यामुळे राज्य सरकारचे वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू नीट मांडत नसल्याचे उदयनराजे यांचे म्हणणे होते. त्यामुळे शरद पवार यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालून राज्य सरकारला सूचना द्यावा. तसंच महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार असून त्यांनीच या मुद्द्यावर देखील तोडगा काढवा असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते. (Udayanraje Bhosale on Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो; उदयनराजे भोसले यांची राज्य सरकारवर टीका)

मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार असल्याचे वक्तव्य यापूर्वी उदयनराजे यांनी केले होते. त्यानुसार उदयनराजे भेटीगाठी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, 9 सप्टेंबर 2020 दिवशी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर वारंवार प्रलंबित झालेल्या सुनावणीला 8 मार्च पासून सुरुवात होणार आहे. ही सुनावणी तब्बल 10 दिवस चालणार असून 8, 9, 10 मार्च 2021 रोजी याचिकाकर्त्यांची बाजू ऐकण्यात येणार आहे. तर 12, 15, 16 मार्च 2021 या दिवशी राज्य सरकार बाजू मांडणार आहे. 17 मार्च दिवशी मध्यस्थी बाजू मांडणार असून 18 मार्च रोजी केंद्र सरकारची बाजू ऐकली जाणार आहे.