IPL Auction 2025 Live

महाराष्ट्रात Lockdown नाही; उद्या रात्री 8 पासून लागू होतील नवे निर्बंध, 7 कोटी नागरिकांना एक महिना मोफत मिळणार 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ- CM Uddhav Thackeray

आज राज्यात तब्बल 60,212 रुग्ण आढळले आहेत. राज्यात चाचण्यांची केंद्रसंख्या, बेड्स, रुग्णालये यांची संख्या वाढवली आहे. मात्र यासोबतच यंत्रणेवरील ताणही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या औषधांचा तुटवडा आहे, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. म्हणूनच सध्याचा काळ अतिशय महत्वाचा आहे

CM Uddhav Thackeray (Photo Credit: FB)

सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. राज्यात दररोज 50 हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राबवण्यात येणाऱ्या उपायोजना, निर्बंध याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘सध्या या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज राज्यात तब्बल 60,212 रुग्ण आढळले आहेत. राज्यात चाचण्यांची केंद्रसंख्या, बेड्स, रुग्णालये यांची संख्या वाढवली आहे. मात्र यासोबतच यंत्रणेवरील ताणही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या औषधांचा तुटवडा आहे, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. म्हणूनच हा काळ अतिशय महत्वाचा आहे.’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे काही मागण्या केल्या आहेत. ते म्हणाले, ‘इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी देण्याची मागणी राज्याने केंद्राला केली होती. मात्र केंद्राने खूप दूरवर असलेल्या राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी दिली. यावर हवाई मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मदत व्हावी अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. दुसरी मागणी ही जीएसटीबाबत (GST) आहे. जीएसटीच्या परताव्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ मिळावी व तिसरी मागणी म्हणजे नैसर्गिक आपत्तीचे सर्व निकष या महामारीला लागू करावेत, जेणेकरून अनेक लोकांना मदत मिळेल.’

पुढे मुख्यमंत्र्यांनी युके (UK) मॉडेलचा आधार घेत म्हटले की, इंग्लंडमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यांनतर तिथे लसीकरण वाढवले म्हणूनच तिथला विषाणू नियंत्रणात आला. त्यानंतर ठाकरे यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना, सेवानिवृत्त डॉक्टरांना, परिचारिका यांना राज्याच्या मदतीला या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.

अखेर मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन नाही तर, काही निर्बंध लागू केले जातील असे सांगितले. यामध्ये, राज्यात किमान 15 दिवस 144 कलम, संचारबंदी लागू असेल. राज्यात अनावश्यक येणे-जाणे होणार नाही. गरजेशिवाय कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंतच अत्यावश्यक सेवा उपलब्ध असतील. राज्यात सार्वजनिक वाहतूक सुरु असेल मात्र त्याचा वापर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच करू शकतील. हॉटेल्स, उपहारगृहे याठिकाणी टेकअवे चालू असेल.' (हेही वाचा: बगाड यात्रेमुळे साताऱ्याच्या बावधनमध्ये उद्भवले कोरोनाचे संकट; ग्रामस्थांनंतर आता पोलीस कर्मचाऱ्यांचीही कोव्हीड-19 चाचणी पॉझिटिव्ह)

पुढे मुख्यमंत्र्यांनी या कठीण काळात जनतेला कशी मदत केली जाईल याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'राज्यातील गरीब 7 कोटी नागरिकांना 1 महिना मोफत 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ मिळणार आहे. तसेच राज्यात पुढील एक महिना शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. नोंदणीकृत घरेलू कामगारांनाही निधि दिला जाणार आहे. यासह नोंदणीकृत फेरीवाले, रिक्षाचालकांनादेखील 1500 रुपये मिळणार आहेत. कोरोना विषाणूचा उपाययोजना, आरोग्य सेवा यांसाठी 3,300 कोटींचा निधि वापरला जाणार आहे. अशाप्रकारे संपूर्णपणे 5 हजार 400 कोटी रुपयांचा निधि महाराष्ट्र सरकार खर्च करणार आहे.‘