CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही- मुंबई महानगरपालिका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकल्याची माहिती देण्यात आली होती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकली असल्याची माहिती समोर आली होती. तसेच पाणीपट्टीची ही रक्कम 24 लाख 56 हजार 469 इतकी आहे. यामुळे मुंबई महापालिकेने (BMC) वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत टाकला आहे, असे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये सकाळपासून झळकत होते. परंतु, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय बंगल्याचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली होती. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकल्याची माहिती देण्यात आली होती. पण आता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिलस्थित ‘वर्षा’ आणि त्याच्याशी संलग्न ‘तोरणा’ या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही, असा अहवाल जलकामे विभागाच्या कार्यालयाने दिला आहे. तसेच या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. हे देखील वाचा- BMC: विना मास्क नाईट क्लबमध्ये करत होते हुल्लडबाजी; मुंबई महानगरपालिकेने ठोठावला 30 हजारांचा दंड
सर्वासाधारणपणे दोन किंवा तीन महिन्यांची पाणीपट्टी थकीत राहिली की मुंबई महापालिका लगेचच सर्वसामान्य मुंबईकराचा जलपुरवठा खंडीत करते. अशा वेळी तब्बल 24 लाख 56 हजार 469 रुपयांची थकबाकी शिल्लख असताना मुंबई महापालिका सदर मंत्र्यांवर अथवा राज्य सरकारवर इतकी का मेहरबान आहे? असा प्रश्न सर्वसामन्य जनतेच्या मनात येऊ लागला होता.