महामार्गालगत असणारी तब्बल 3100 बार आणि दारूची दुकाने पुन्हा सुरु होण्याची शक्यता

ग्रामीण भागातील अशा प्रकारचे बार आणि दारूची दुकाने पुन्हा करू द्यावीत असे आदेश राज्यातील जिल्हाअधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर लगेचच महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असलेले बार, दारूची दुकाने बंद झाली होती. 1 एप्रिल 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाचा हा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र आता राज्य सरकारने ग्रामीण भागात हे नियम शिथिल करण्यासाठी पावले उचलली आहेत. ग्रामीण भागातील अशा प्रकारचे बार आणि दारूची दुकाने पुन्हा करू द्यावीत असे आदेश राज्यातील जिल्हाअधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या नव्या नियमाचा फायदा ग्रामपंचायत असलेल्या गावांना होण्याची शक्यता आहे, म्हणून हा नियम लागू करण्यात येईल.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 3100 बार आणि दारूची दुकाने पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने याबाबत काही नवीन नियम बनवले आहेत, ज्याद्वारे आता दारू विकण्याचा परवाना घेण्यासाठी ज्या गावात दारू विकायची आहे त्याची लोकसंख्या कमीतकमी 3000 इतकी असणे गरजेचे आहे. तसेच हे दुकान महानगरपालिकेच्या सीमेपासून कमीतकमी 3 किलोमीटर दूर असणे आवश्यक आहे. किंवा नगर पंचायतीपासून कमीत कमी 1 किलोमीटर दूर असणे गरजेचे आहे. हा परवाना तुम्ही 2 वर्षांची (2017-18 आणि 2019-20) फी भरून नुतनीकरण करू शकता.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अशा प्रकारच्या परवाना धारकांनी पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाच्या निर्णयाबाबत पुन्हा एकदा विचार करण्यात यावा अशा आशयाची याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्याद्वारे आता कोर्टाने बार आणि दारूविक्रीसाठी असणारे काही नियम शिथिल केले आहेत.