वाद मिटला : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी करणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

ही माहिती महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (संग्रहित - संपादित प्रतिमा)

साहित्यप्रेमींचा सोहळा म्हणून ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’कडे पहिले जाते. यावर्षी यवतमाळ येथे 92 वे साहित्य संमेलन पार पडणार आहे. मात्र वाद आणि संमेलन यांचे फार जुने नाते आहे, यावर्षीही या संमेलनाला असेच गालबोट लागले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सेहगल यांचे उद्घाटक म्हणून निमंत्रण रद्द केल्याने साहित्य मंडळावर आणि आयोजक समितीवर कडाडून टीका झाली. त्यानंतर नवीन उद्घाटक म्हणून मंडळाकडून काही नवी नवे सुचवण्यात आली, मात्र आता या वादावर पडदा पडला आहे. आता संमेलनाचे उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात येणार आहे. ही माहिती महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर यांनी दिली.

नुकतीच उद्घाटकाच्या नवीन नावावर चर्चा करण्यासाठी साहित्य मंडळ आणि घटक संस्थांची एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी उद्घाटक म्हणून बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. या महिलेचे नाव अजूनतरी जाहीर करण्यात आले नाही. तसेच सेहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याने त्यांचे भाषणही वाचून दाखविले जाणार नाही.

दरम्यान सेहगल यांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे उद्घाटक म्हणून निवडलेल्या तीनही साहित्यिकांनी उद्घाटन करण्यास नकार दिला. तसेच अनेक साहित्यिकांनी यंदाच्या संमेलनावर बहिष्कार टाकला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (ता.11) वाराणसीला आणि पक्षाचा कामासाठी दिल्लीला जाणार असल्याने ते या संमेलनाच्या उद्‍घातानाला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, 12 किंवा 13 रोजी ते येण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.