Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणू रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर; राज्यात एकूण 1,01,141 संक्रमित लोक
आता राज्याने चक्क 1 लाख रुग्णांचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रात आज 3493 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे व यासह राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 1,01,141 वर पोहोचली.
अखेर अडीच महिन्यांचा काळ उलटून गेल्यावरही महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमितांच्या संख्येत काहीच फरक पडला नाही. आता राज्याने चक्क 1 लाख रुग्णांचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रात आज 3493 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे व यासह राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 1,01,141 वर पोहोचली. आज 127 नवीन रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 3717 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात 47,793 रुग्ण बरे झाले आहेत, त्यापैकी आज 1718 रुग्णांना बरे झाल्यावर सोडण्यात आले. सध्या देशात महाराष्ट्र हे सर्वात बाधित राज्य आहे.
एएनआय ट्वीट-
महाराष्ट्रात सध्या 49616 सक्रीय प्रकरणे आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाच्या बाबतीत भारतामध्ये सध्या चिंतेची परिस्थिती आहे. देशात ज्या वेगाने दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत ते पाहून या आजाराची व्याप्ती लक्षात येते. आता तर रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. काल संध्याकाळी भारतातील वाढलेल्या घटनांमुळे सध्या भारत 4 थ्या क्रमांकाचा कोरोना बाधित देश बनला आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे सर्वाधिक रुग्ण आहेत. पावसाळ्यात अशा स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये वाढ गृहित धरुन आधीपासूनच विलगिकरण केंद्र व अन्य सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यात येणार आहेत. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय)
यामध्ये सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून सहा-सात वेळा निर्जंतुकीकरण, कंटेनमेंट झोनमध्ये वैद्यकीय शिबिरांद्वारे तपासण्या, जीवनसत्त्व सी गोळ्यांचे वाटप, अशा उपाययोजना राबवल्या जातील. मुंबईत कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने, या महिन्याच्या अखेरीस 9000 हजार ऑक्सिजन-समर्थित बेड बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हे बेड्स तयार करण्याच्या उद्देश इंटेंसिव्ह केअर युनिट्स (ICU) आणि व्हेंटिलेटरवरील अवलंबन कमी करणे हे आहे. तसेच शारिरिक अंतर, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे या सवयी अंगीकारून कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
दरम्यान, राज्यात सध्या 53 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6,024,977 नमुन्यांपैकी 1, 01,141 नमुने पॉझिटिव्ह (16.18 टक्के ) आले आहेत. राज्यात 5,79, 569 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 1553 संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 75,067 खाटा उपलब्ध असून, सध्या 28, 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 47.3 टक्के एवढे आहे, तर राज्यातील मृत्यू दर 3.7 टक्के आहे.