IPL Auction 2025 Live

Vinayak Mete यांच्या अपघातास कारणीभूत असलेला टेम्पो सापडला

पोलिसांना दमण येथे हा टेम्पो सापडला आहे.

Vinayak Mete (Photo Credits: FB)

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा आयशर टेम्पो सापडला आहे. हा टेम्पो पालघर जिल्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या टेम्पोच्या मालकाचा शोध सुरू केला आहे. आयशर टेम्पो गुजरातच्या दिशेला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या टेम्पोचा शोध घेण्यासाठी पालघर पोलिसांचे विशेष पथक रवाना गुजरातच्या दिशेने रवाना झाले होते. पोलिसांना दमण येथे हा टेम्पो सापडला आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या टेम्पोचा नंबर डीएन 09 पी 9404 असा असून ड्रायव्हरचे नाव उमेश यादव आणि मालकाचे नाव रामबचन यादव असल्याचे समोर आले आहे. विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे 5 वाजता मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात मेंदूला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. विनायक मेटेंच्या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. (हेही वाचा - Vinayak Mete Funeral: शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यावर आज बीड येथे अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित)

विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणी राज्यभरात जोर धरू लागली आहे. तथापी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेटें यांच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मेटे यांच्या गाडीचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, आज विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 4 वाजता मेटे यांच्या मूळगावी अंतिमसंस्कार होणार आहेत.