Legislative Rainy Session 2020: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था केली जाणार
कोरोनाच्या संकटामुळे हे अधिवेशन केवळ दोनचं दिवसाचे असणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केला जाणारा चहापानाचा कार्यक्रमही यंदा रद्द करण्यात आला आहे.
Legislative Rainy Session 2020: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या म्हणजेच सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे हे अधिवेशन केवळ दोनचं दिवसाचे असणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केला जाणारा चहापानाचा कार्यक्रमही यंदा रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना संकटामुळे जून महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन 2 वेळा पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झालेला नाही. त्यामुळे यंदा केवळ दोन दिवसचं पावसाळी अधिवेशन असणार आहे. राज्यातील पुरवणी मागण्याना विधिमंडळाची मंजुरी आवश्यक असल्याने 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता यंदा सभागृहात बसण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. (हेही वाचा - Bihar Assembly Election 2020: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा बिहार विधानसभा निवडणुकीत वापर, BJP स्टिकर सोशल मीडियावर व्हायरल)
दरवर्षी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री चहापानाचा कार्यक्रम आयोजित करून विरोधकांना निमंत्रित करतात. विधिमंडळाच्या कामकाजाबाबत विरोधकांशी संवाद साधता यावा व समन्वयाने कामकाज करता यावे हा यामागचा उद्देश असतो. परंतु, कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन यावर्षी चहापाण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी सूचना होणार नाहीत. अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि शासकीय विधेयके मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत. 7 सप्टेंबरला पहिल्या दिवशी अध्यादेश पटलावर ठेवण्यात येतील. तसेच सन 2020-21 या वर्षाच्या पुरवणी मागण्या आणि 11 शासकीय विधेयके सादर करण्यात येतील.