Washroom-on-Wheels: महापालिकेच्या जुन्या भंगार बसेसचा पुनर्वापर करून पुण्यातील दांपत्याने महिलांसाठी सुरू केली 'ती टॉयलेट' बस सुविधा; पहा काय आहे खास

जुन्या भंगारात निघालेल्या बसेसचा पुनर्वापर चांगल्या कामासाठी करण्याच्या प्रयत्नातून ही संकल्पना मांडण्यात आली आहे.

Women's Toilets (photo Credits: AFP)

Washroom-on-Wheels: पुणे शहरात महापालिकेच्या जुन्या भंगार बसेसचा (Bus) पुनर्वापर करून महिलांसाठी खास 'ती टॉयलेट' (Ti Toilet) निर्माण करण्यात आली आहेत. जुन्या भंगारात निघालेल्या बसेसचा पुनर्वापर चांगल्या कामासाठी करण्याच्या प्रयत्नातून ही संकल्पना मांडण्यात आली आहे. सध्या पुण्यातील 'वॉशरुम-ऑन-व्हील्स' (Washroom-on-Wheels) या सुविधेची देशभरात चर्चा सुरु आहे. या स्वच्छतागृहांचा लाभ कोणतीही महिला फक्त 5 रुपायांमध्ये घेऊ शकते. विशेष म्हणजे या बसमध्ये महिला सॅनेटरी नेपकिन तसेच डायपरदेखील खरेदी करू शकतात.

या उपक्रमाची सुरुवात उल्का सादळकर आणि राजीव खैर या दांपत्याने केली आहे. या दांपत्याने पुणे महापालिकेच्या मदतीने भंगार झालेल्या बसेसमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे सुरू केली आहेत. सध्या पुणे शहरात अशा 13 बसेस तयार करण्यात आल्या आहेत. महिला केवळ 5 रुपयांत या सुविधेचा लाभ घेऊ शकता. या बसेसमध्ये महिला लहान मुलांना स्तनपानही करू शकतात. (हेही वाचा - जेव्हा अंधेरी स्थानकावर सरकता जिना अचानक उलट्या दिशेने सरकतो: पहा व्हायरल व्हिडिओ)

तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी महिलांसाठी स्वच्छतागृह सुरु करण्याची योजना आखली होती. त्यांनी उद्योजक उल्का सादळकर आणि राजीव खैर यांना यासंदर्भात कल्पना दिली होती. उल्का सादळकर आणि राजीव खैर यांना सामाजिक कार्यासाठी आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सादळकर यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचा पुण्यातील अनेक महिला लाभ घेत आहेत. महिलांची कुंचबना होऊ नये यासाठी या बसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Women's Toilets (Photo Credits: AFP)

वर्दळीच्या भागात, आठवडी बाजारात महिलांसाठी शौचालयासाठी अडचणीत जातात. महिलांसाठी शौचालये उपलब्ध व्हावी, यादृष्टीने महिलांसाठी टॉयलेट बस निर्माण करण्यात येत आहेत. या बसेसला 'ती बस' असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बसच्या बाजूला उपाहारगृहांचीही सोय करण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी चहा, नास्ताची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये लाइट आणि इतर उपकरणे सोलार पॅनलवर चालतात. त्यामुळे यासाठी खर्चही कमी लागतो. या योजनेला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशातील इतर शहरातही लवकरचं ही योजना सुरु करण्यात येणार आहे.