'आमदार Nitin Deshmukh यांनी केलेले अपहरणाचे आरोप खोटे, आम्हीच त्यांना सन्मानाने परत पाठवले'; एकनाथ शिंदे गटाचा दावा

अशात बंडखोर गटासोबत असलेले आमदार नितीन देशमुख काल महाराष्ट्रात परत आले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण कसाबसा जीव वाचवून परत आलो असल्याचे सांगितले. आपल्याला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप त्यांनी शिंदे गटावर केला होता.

आमदार नितीन देशमुख (Photo Credit ANI)

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी मोठा आरोप केला होता. माझे अपहरण करून मला सुरतला नेण्यात आले. तिथे गुजरात पोलिसांनी आपल्याला जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांच्या नावाखाली आपल्या शरिरात इंजेक्शन्स खुपसले. तिथून गुवाहाटीलाही नेण्यात आले व अखेर मोठ्या मुश्किलीने आपण तिथून बाहेर पडून मुंबईला आलो असल्याचे त्यांनी म्हटले होते. या आरोपांनंतर आता शिंदे गटाने काही फोटो व व्हिडीओ शेअर केले असून, आम्हीच देशमुख यांना सन्मानाने मुंबईला पाठवल्याचे सांगितले आहे.

शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, एका चार्डर्ड प्लेनजवळ नितीन देशमुख हसतमुखाने उभे आहेत. देशमुख यांचे आरोप फेटाळत शिंदे यांनी देशमुखांचे फोटो पुरावा म्हणून सादर केले आहेत. देशमुखांची परत जायची इच्छा होती म्हणून त्यांना चार्टर्ड प्लेनने सुखरूप नागपूरला सोडण्यात आले, असा दावा शिंदे गटाने केला आहे.

सध्या राज्यात सुरु असलेल्या पॉलिटिकल ड्रामामध्ये रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अशात बंडखोर गटासोबत असलेले आमदार नितीन देशमुख काल महाराष्ट्रात परत आले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण कसाबसा जीव वाचवून परत आलो असल्याचे सांगितले. आपल्याला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप त्यांनी शिंदे गटावर केला होता. त्यानंतर आज शिंदे गटाकडून सांगण्यात आले की, नितिन देशमुख यांचा गुवाहाटी ते नागपूर हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला आहे. आम्हीच त्यांना सन्मानाने अकोल्याला पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. (हेही वाचा: एकनाथ शिंदे यांना धक्का; ती सही माझी नव्हेच; शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट)

नितीन देशमुखांच्या सोबत दोन कार्यकर्ते दिले असल्याची माहितीही शिंदे गटाकडून देण्यात आली आहे. यासोबतच एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाला दिलेल्या त्या पत्रावर असलेली सही आपली नव्हेच, असा दावाही नितीन नितीन देशमुख यांनी केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असताना आपण कोणत्याही कागदावर सही केली नाही, असे ते म्हणाले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून देशमुख एका पत्रावर सही करत असटानाचाही एक फोटो जारी करण्यात आला आहे. हे फोटो समोर आल्यानंतर आता नेमके कोण खरे बोलताय याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.