Thane Snake Attack: ठाण्यात 2 महिलांचा सर्पदंशाने मृत्यू; जाणून घ्या सर्पदंश झाल्यास काय कराल?
साप चावल्यानंतर जखमेभोवती खाज येणं, वेदना जाणवणं, सूज येणं या बाबी त्याचे संकेत देतात. जर साप विषारी असेल तर व्यक्तीला मळमळणं, उलट्या होणं, शुद्ध हरपणं, थकवा जाणवणं, श्वास घ्यायला त्रास जाणवणं हा त्रास होतो.
ठाण्यामध्ये दोन विविध घटनांमध्ये सर्पदंशाने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या दोन्ही घटना 4 जूनच्या आहेत. शहापूर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी दुपारी अल्याणी गावातील 19 वर्षीय अभियांत्रिकीची विद्यार्थिनी राणी हरिश्चंद्र निमसे ला तिच्या घरी झोपलेली असताना सर्पदंश झाला. "तिला तातडीने शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिची प्रकृती बिघडल्याने तिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, परंतु वैद्यकीय सुविधेत नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला," असे अधिकाऱ्याने सांगितले.
बुधवारी झालेल्या दुसऱ्या घटनेत, भातसा नगरमधील दुखांबे येथील रहिवासी रेश्मा अजय दिवा (22) हिला भाजीपाला घेण्यासाठी जंगलात गेल्यावर सर्पदंश झाल्याची माहिती खर्डी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. ती जागीच कोसळली. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि ग्रामीण आणि जंगलालगतच्या भागातील रहिवाशांना विशेषतः पावसाळ्यात सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. जंगलात जाताना आणि जमिनीवर झोपताना लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सर्पदंश झाल्यास काय कराल?
साप चावल्यानंतर जखमेभोवती खाज येणं, वेदना जाणवणं, सूज येणं या बाबी त्याचे संकेत देतात. जर साप विषारी असेल तर व्यक्तीला मळमळणं, उलट्या होणं, शुद्ध हरपणं, थकवा जाणवणं, श्वास घ्यायला त्रास जाणवणं हा त्रास होतो. सर्पदंश झाल्याचं जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. साप विषारी, बिनविषारी आहे की नाही हे न पाहता डॉक्टरांची मदत घ्या. अनेकदा तुमचा अंदाज चुकू शकतो आणि लक्षणं दिसेपर्यंत विष शरीरात पसरलेलं असू शकतं.
जर तुम्हांला विषारी साप जरी चावला तरी शांत राहणं, फार हालचाल न करणं तुमच्या जीवावरचा धोका टाळू शकतो. सापाचं विष सर्पदंशानंतर थेट रक्तात जातं हे मिथक आहे. ते lymphatic system मधून शरीरात जाते. Lymph हे तुमच्या शरीरातील एक द्रव आहे ज्यामध्ये पांढऱ्या रक्त पेशी असतात.