Thane: धक्कादायक! महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याकडून जीवघेणा हल्ला; दोन बोटे तुटली
हा हल्ला एका फेरीवाल्याने (Hawkers) केला असून यामध्ये पिंपळे यांची दोन बोटे तुटली आहेत
ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्यावर सोमवारी सायंकाळी भीषण हल्ला झाला आहे. हा हल्ला एका फेरीवाल्याने (Hawkers) केला असून यामध्ये पिंपळे यांची दोन बोटे तुटली आहेत. तर हल्ल्यादरम्यान पिंपळे यांच्या संरक्षणासाठी धावलेल्या त्यांच्या सुरक्षारक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कासारवडवली जंक्शनजवळ फेरीवाल्यांना हटवण्याच्या देखरेखीवर असताना एका व्यक्तीने पिंपळे यांच्यावर हा हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी अमर यादवला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या ठाणे महानगरपालिका परिसरात फेरीवाल्यांचे प्रमाण आणि मुजोरीही वाढली आहे. माजिवाडा-मानपाडाच्या AMC कल्पिता पिंपळे या परिसर फेरीवाला मुक्त करत होत्या, त्यावेळी फेरीवाल्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप माळवी यांनी माहिती दिली. सध्या पिंपळे व त्यांच्या सुरक्षारक्षकाला उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा: Junnar Leopard Attack: जुन्नर मध्ये 3 वर्षीय बाळावर बिबट्याचा गंभीर हल्ला)
या घटनेनंतर अनेक नेत्यांनी घडलेल्या प्रकरणाचा तीव्र निषेध करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. आशिष शेलार म्हणतात, ‘ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करुन एका फेरिवाल्याने तीन बोटे तोडल्याची अत्यंत चिड आणणारी घटना आज ठाण्यात घडली. राज्यात कायद्याचे राज्य आहे का? सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे का? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते!’
बाळा नांदगावकर म्हणतात, ‘ठाणे महापालिका साह्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचे सहकारी यांच्यावर अमरजित यादव या अवैध फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात पिंपळे यांची बोट कापली गेली,कारण काहीही असो, असा हल्ला तो सुद्धा महिला अधिकारीवर करणाऱ्या या गुन्हेगाराला तारीख पे तारीख न देता त्वरित शासन करावे जेणेकरून अशा प्रवृत्तींना चाप बसेल.’