Thane: मॅट्रीमोनियल साईटवर 20 हून अधिक महिलांची फसवणूक; अडीच कोटी लुबाडले, आरोपीला ठाण्यातून अटक

त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

तुम्हाला रणवीर सिंगचा ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ हा चित्रपट आठवत असेल, ज्यामध्ये अभिनेता मुलींशी संबंध ठेऊन त्यांची पैशांची फसवणूक करत असे. आता अगदी या चित्रपटाच्या कथेप्रमाणे देशभरात फिरून 20 हून अधिक महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने महिलांची तब्बल अडीच कोटींची फसवणूक केली असून, ठाणे पोलिसांनी पुद्दुचेरी येथील रहिवाशाला अटक केली आहे.

पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी पत्रकारांना सांगितले की, ठाणे शहरातील एका महिलेने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. महिलेने सांगितले की, गेल्या वर्षी एका पुरुषाने मॅट्रिमोनियल वेबसाइटद्वारे तिच्याशी संपर्क साधला आणि दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले. तक्रारीनुसार, आरोपीने दावा केला होता की त्याने पॅरिसमधील एक हॉटेल विकले होते आणि त्याचे पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अडकले होते. (हेही वाचा: BMC मध्ये नोकरीचं आमिष दाखवत एका व्यक्तीने 6 जणांना फसवत उकळले 13.34 लाख)

ती रक्कम काढण्याच्या बदल्यात आरोपीने महिलेकडून 16.86 लाख रुपये घेतले. फिर्यादीनुसार, आरोपीने महिलेला दुप्पट रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याने पैसे परत केले नाहीत. या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलिसांनी फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे डीसीपी राठोड यांनी सांगितले. प्रजित जोगीश केजे उर्फ ​​प्रजित तायल खालिद उर्फ ​​प्रजित टीके (44) असे आरोपीचे नाव आहे. तो पुद्दुचेरीतील ओडटिंगम माही येथील रहिवासी आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी ठाण्यात आलेल्या प्रजितला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केरळ, कर्नाटक आणि पश्चिम बंगालसह देशभरात हीच पद्धत अवलंबून आरोपींनी सुमारे 26 महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून सुमारे 2.58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे चौकशीत आढळून आले.