IPL Auction 2025 Live

Thane: घरावर दगड कोसळून 35 वर्षीय महिला ठार, ठाण्यातील मुंब्रा येथील घटना

कविता सुनील वनपसरे महिलेचे नाव आहे. मुंब्रा येथील डोंगर असलेल्या परिसरात अनधिकृत लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा दरड, दगड कोसळण्याच्या घटना घडतात. या आधीही या परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्या स्थानिकांच्या जीवावरही बेतल्या आहेत.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुंब्रा (Mumbra) येथे घरावर दगड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 35 वर्षीय महिला ठार झाली आहे. कविता सुनील वनपसरे महिलेचे नाव आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) प्रमुख अविनाश सावंत यांनी सांगितले प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शहरातील गावदेवी परिसरात शुक्रवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी 5.20 च्या सुमारास ही घटना घडली. मुंब्रा येथील डोंगर (Mumbra Hills) असलेल्या परिसरात अनधिकृत लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा दरड, दगड कोसळण्याच्या घटना घडतात. या आधीही या परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्या स्थानिकांच्या जीवावरही बेतल्या आहेत.

मुंब्रा येथील गावदेवी परिसरात डोंगरावरुन एक दगड घरंगळत खाली आला. हा दगड कविता वनपसरे यांच्या घरावर आदळला. अचानक झालेल्या घटनेमुळे कविता यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी महिलेचा (कविता वनपसरे) मृतदेह ताब्यात घेतला असून, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कळवा पोलीस, टीएमसीचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि आरडीएमसी टीम घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाली आणि मदत सुरु केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, Crimes in Maharashtra: मानवी तस्करी प्रकरणात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, तर हत्येच्या घटनांबाबत तिसरा नंबर- NCRB)

प्राप्त माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून, परिसरातील 14 सदनिका रिकामी करण्यात आल्या आहेत. या ठिकाणच्या नागरिकांना परिसरातील नागरी शाळेत हलवण्यात आले आहे, असेही सांगण्यात येत आहे. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती आहे.