Thackeray Group Meeting: महाराष्ट्रात आज बैठकांचा सिलसिला; ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठका

त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस महत्त्वाचा ठरत आहे. आज राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit - Facebook)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षापाठोपाठ आता शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही बंडखोरी झाली. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस महत्त्वाचा ठरत आहे. आज राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना (UBT) पक्षाची तर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विविध नेत्यांची अशा दोन वेगवेगळ्या बैठका पार पडत आहेत. या बैठकांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे गटाची बैठक शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) येथे आज दुपारी 12.30 वाजता पार पडत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे आमदार, खासदार आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आगामी निवडणुका महाविकासआघाडीतच (Maha Vikas Aghadi) लढायच्या की, आपला एकला चलोरेचा मार्ग अनुसरायचा यावर विचार होण्याची शक्यता आहे. बैठक झाल्यावर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेतच उद्धव ठाकरे आपली भूमिका व्यक्त करतील असे समजते. (हेही वाचा: Ajit Pawar On Eknath Shinde: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल; एकनाथ शिंदे यांची माहिती)

दरम्यान, अजित पवार यांच्या शपथ विधीनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीने जोरदार अस्वस्थता पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्यामुळे सत्तासमिकरणे बिघडली आहेत. शिंदे गटाचे महत्त्व कमी झाले आहे, असे अनेकांना वाटते. त्यामुळे या बैठकीत अनेकांनी आपली भावना एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविल्याचे समजते.

दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्या मनसे पदाधिकाऱ्यांचीही एक बैठक पार पडली. या बैठकीतही आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पक्षनेत्यांची भावना जाणून घेतली. या वेळी आपण ही लोकसभा ताकतीने लढूया. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊया, अशी भावना व्यक्त केली. राज ठाकरे यांनीही त्याला अप्रत्यक्ष संमती दिली असल्याचे समजते. मात्र, स्वत: राज ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता लवकरच आपली एक आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल. जो काही निर्णय असेल तो आपणास कळवला जाईल, असे राज यांनी म्हटले.