खुशखबर : राज्यात 3 फेब्रुवारीपासून सुरु होणार शिक्षकभरती
आगामी निवडणूक आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
गेली कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली शिक्षक भरती लवकरच करण्यात येईल अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी नुकतीच केली होती. आता यावर अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. हीच गोष्ट शिक्षकांसाठी खुशखबर ठरत आहे कारण, आता शिक्षण विभागाने शिक्षक भरती 3 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे. आगामी निवडणूक आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. भरतीच्या नियोजित कार्यक्रमाची माहिती शिक्षण आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिली आहे.
राज्यात गेली अनेक वर्षे शिक्षक भरती प्रलंबित आहे. येणाऱ्या लोकसभा नुवादानुकीच्या आचारसंहितेपूर्वी ती मार्गी लावावी, अन्यथा निवडणुकीत आमच्याकडून सहकार्य मिळणार नाही असा इशारा डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी दिला आहे. त्यामुळे सरकार आता या भरतीबाबत दक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकांत सरकारविरोधात सुशिक्षित बेरोजगारांची नाराजी नको म्हणून सरकारकडून आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. (हेही वाचा : मेगाभरतीनंतर राज्यात ‘शिक्षक भरती’ची घोषणा; पाहा कोणत्या इयत्तांसाठी किती आहेत रिक्त जागा)
केंद्राने आर्थिक निकषांनुसार सवर्णांना 10 टक्के आरक्षण जाहीर केले, परंतु त्याबाबत शिक्षण विभागाला लेखी पत्र मिळाले नाही. त्यामुळे शिक्षक भरतीत हे आरक्षण लागू होईल का, याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे.
भरतीचा पहिला टप्पा – 18 हजार पदे
- 21 जानेवारी : पवित्र पोर्टलवरील अर्ज दुरुस्ती
- 30 जानेवारी : पवित्र पोर्टल अपलोड करणे
- 3 फेब्रुवारी : भरतीची जाहीरात प्रसिद्ध करणे