मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव ओव्हरफ्लो; मुंबईकरांचे पाणीसंकट टळण्याची चिन्हं
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाण्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी शहापूर येथील तानसा तलाव ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाण्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी शहापूर येथील तानसा तलाव आज (25 जुलै, गुरुवार) दुपारपासून ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली आहे. तानसा तलावातून मुंबईला दररोज जवळपास 450 मिलियन लिटर पाणी पुरवठा केला जातो.
मुंबईकरांना सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जात असून मुंबईकरांना वर्षभरात 14 दशलक्ष लीटर पाण्याची गरज असते. दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन तलाव ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा साठा वाढून मुंबईला पाणीपुरवठा करणारे अन्य तलावही लवकरच भरतील. (मुंबईच्या तलावामध्ये केवळ 5% पाणीसाठा; पाणी जपून वापरण्याचं BMC चं आवाहन)
पावसाळा सुरु होण्यापूर्वी मुंबईच्या तलावांमध्ये केवळ 5% पाणीसाठा शिल्लक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले होते. त्यामुळे मुंबईत 10% पाणीकपात देखील करण्यात आली होती. त्यातच पावसाळा सुरु झाल्यानंतर जून महिना कोरडा गेल्याने पाणीटंचाईचे संकट मुंबईकरांच्या डोक्यावर होते. मात्र यापूर्वी झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली होती. त्यामुळे 10% पाणीकपातही रद्द करण्यात आली होती. (तलावसाठ्यात वाढ झाल्याने मुंबईसह उपनगरांमधील 10 टक्के पाणीकपात रद्द)
आता तानसा तलाव भरल्याने मुंबईकरांचा पाणीप्रश्न सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. मात्र तलावातील पाणी वर्षभर पुरवायचे असल्याने इतर तलावही भरणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाधानकारक पाऊस झाल्यास मुंबईकरांचा पाणी प्रश्न नक्कीच सुटेल, अशी आशा आहे.