लॉक डाऊनचा फायदा घेत मटणाचे भाव गगनाला भिडले; ठाण्यात 900 रुपये प्रती किलोने विक्री, विक्रेत्यावर कारवाई
कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढण्यासाठी सध्या देशात लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे. अशात फक्त जीवनावश्यक गोष्टीच बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये मांसाहाराबाबत काही दिवस वाद सुरु होते, अखेर शासनाने मटण, मासे आणि अंडी विकण्यावर निर्बंध हटवले आहेत. मात्र लॉकडाऊन चा फायदा घेत मांसाहाराच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ठाणे येथे मटणाची तब्बल 900 ते 1000 प्रति किलो या दराने विक्री चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यातही साधारण हेच दर चालू आहेत.
ठाण्यातील कोपरी परिसरातील तुळजा भवानी मटण शॉप उघडल्यावर ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. याच गोष्टीचा फायदा घेऊन दुकानदाराने मटणाचा दर 900 रुपये किलो लावला. त्यानंतर काही संतप्त ग्राहकांनी याची पोलिसांकडे तक्रार केली, व अखेर पोलिसांनी या विक्रेत्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या विक्रेत्याने माफी मागत 600 ते 700 दराने विक्री करण्याचे काबुल केले. या प्रकारानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व दुकानांना चढ्या भावात विक्री न करण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा: Lockdown: दारू मिळत नसल्याने सोलापूर येथील एका तळीरामाने चक्क दारूचे दुकानच फोडले; पोलिसांत गुन्हा दाखल)
सरकारने मांसाहार विक्रीसाठी परवानगी दिली आहे. मात्र प्राण्यांच्या वाहतुकीमध्ये अडचण येत असल्याने दुकानदार चढ्या भावाने त्यांची विक्री करत आहेत. सध्या चिकनचा दर 170 रुपये किलो असा चालू असून, मासळी व मटणाच्या दरात हलकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा कहर सुरु झाल्यावर मांसाहारची विक्री काही प्रमाणत कमी झाली होती. मात्र शासनाने मांसाहारामधून धोका नसल्याचे सांगितल्यावर पुन्हा विक्रीमध्ये तेजी आली. मात्र आता याच्या दरामध्ये दिवसागणिक चढउतार होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.