जळगाव: रुग्णालयाच्या शौचालयात आढळला मृतदेह; दोषींवर कडक कारवाई करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा

जळगावच्या (Jalgaon) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयातील आठ दिवस बेपत्ता असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृतहेद बुधवारी शौचालयात आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

जळगावच्या (Jalgaon) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयातील आठ दिवस बेपत्ता असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृतहेद बुधवारी शौचालयात आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेत उपचारा दरम्यान निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचारी यांच्या विरोधात आता शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. अशा अमानुष कृत्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कायदेशीररित्या कठोर कारवाई केली जात आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे ते म्हणाले आहेत.

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. याच पाश्वभूमीवर जळगावमधील रुग्णालयातील घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जळगावमधील शौचालयात मृतदेह सापडले त्या घटनेची गृहमंत्रालय गंभीर दखल घेत आहे. काही जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अशा अमानुष कृत्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कायदेशीररित्या कठोर कारवाई केली जात आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. हे देखील वाचा- Aurangabad Double Murder Case: औरंगाबाद येथील बहीण-भावाच्या हत्येचे गूढ उकलले; चुलतभावानेच दाजीसह केला घात

अनिल देशमुख यांचे ट्वीट- 

नेमके प्रकरण काय आहे?

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील 82 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेला प्रकृती गंभीर झाल्याने एक जून रोजी जळगावच्या शासकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. मात्र, 24 तासानंतर ही महिला बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था असताना गेल्या आठवडाभरापासून महिला सापडत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांनी सदर महिला हरवल्याची नोंद शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस तपास सुरु असतानाच कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सात मधील बाथरुम मधून दुर्गंधी येत असल्याच समोर आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दरवाजा तोडला असता सदर महिला मृत अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती.

भाजप नेते किरीट सोमय्या यांना गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून धक्कादायक ट्विट केले होते. ज्यात मुंबईतील रुग्णालयातून तब्बल 6 कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह गायब झाल्याची माहिती दिली होती. यामुळे संपूर्ण मुंबई परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.