Supriya Sule On Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांच्या विधानावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, काय म्हणाल्या घ्या जाणून

त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आक्रमक झालेली पाहायला मिळाली.

Supriya Sule On Abdul Sattar | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीप्पणी केली. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आक्रमक झालेली पाहायला मिळाली. आता खुद्द सुप्रिया सुळे यांनीही याबाबत आता प्रतिक्रिया दिली आहे. सत्तार अथवा कोणाचाही उल्लेख न करता सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ''महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात'', असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया''. पुढच्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, ''याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा 'सुसंस्कृतच महाराष्ट्र' आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.'' (हेही वाचा, Abdul Sattar Controversial Statement: अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावरुन वाढता दबाव, विरोधक आक्रमक, CM एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान)

ट्विट

ट्विट

दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्याभर असंतोष पाहायला मिळत आहे. या असंतोषातूनच अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तो घ्यावा, अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षात असलेले सर्वच राजकीय पक्ष विशेष आक्रमक झाले आहेत. त्यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतो आहे. या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरआव्हान निर्माण झाले आहे.