Sujay Vikhe Patil Vs Jayashree Thorat: जयश्री थोरात यांच्याबद्दल सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्याचे आक्षेपार्ह विधान; संगमनेर येथे जाळपोळ
काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe patil) यांचा पाठिमागील पिढ्यांपासून चालत आलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. त्याची परिणीती संगमनेर (Sangamner) येथील एका कार्यक्रमात आली. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. त्यासाठी त्यांनी याच तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या वेळी त्यांचे समर्थक असलेल्या समर्थक वसंतराव देशमुख यांनी यांनी थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवरचे वक्तव्य केले. या आक्षेपार्ह वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतो आहे. दरम्यान, या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या आंदोलनाला काहीसे हिंसक वळण लागले.
काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल झालेल्या आक्षेपार्ह विधानानंतर थोरात आणि काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले. त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल संबंधीत व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करवा अशी मागणी करत पोलीस स्टेशनसमोर ठिय्या धरला. तसेच, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासही खूप विलंब लावल्याचा आरोप केला. या वेळी कार्यकर्त्यांनी सुजय विखे पाटील यांचे बॅनर फाडत निषेध व्यक्त केला. दरम्यान, सभेहून परतत असलेल्या सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, Maha Vikas Aghadi: उद्धव ठाकरे यांचे समाधान? शरद पवार आणि काँग्रेस खूश? महाविकासआघाडीच्या जागावाटपावर तोडगा)
सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया
काँग्रेसने केलेल्या हिंसक आंदोलनाविरोधात कारवाई व्हावी यासाठी सुजय विखे पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून आंदोलन सुरु केले आहे. सभेहून परतत जाणाऱ्या सामान्य नागरिकांवर जीवघेणा हल्ला केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे. दरम्यान, या घटनेबद्दल बोलताना सुजय विखे पाटील यांनी म्हटले की, राजकारणामध्ये महिलांचा सन्मान व्हायलाच हवा. मी त्यांना (जयश्री थोरात) ताई म्हणतो. काही लोकांकडून भावनेच्या भरात चुकीचे वक्तव्य झाले. पण, म्हणून सामान्य नागरिकांवर प्राणघातक हल्ला करणेही बरोबर नाही, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Rift in MVA Alliance: महाराष्ट्रात कॉंग्रेस महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढणार; नाना पटोले-संजय राऊत यांच्यामधील वादाच्या चर्चेनंतर Ramesh Chennithala यांनी केलं स्पष्ट)
''मंचावर वसंत देशमुख तोंडाची गटारगंगा ''
डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सुरु असताना व्यासपीठावरील लोक हसत होते. त्यामुळे स्थानिक महिलांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. या महिलांनी थेट सभास्थळी धाव घेत, आक्षेपार्ह आणि विधान करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत, ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आता जाळपोळीच्या घटनांविरोधात गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी करत विखे पाटील याचेही कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या प्रकणात पोलीस काय भूमिका घेतात, कोणावर गुन्हे दाखल होतात याबाबत उत्सुकता आहे.