Pune Suicide: बेड मिळत नसल्याने कोरोनाबाधित महिलेची गळफास लावून आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना
राज्यात दररोज वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवर असह्य ताण पडू लागला आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus) थैमान घातला आहे. राज्यात दररोज वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवर असह्य ताण पडू लागला आहे. तर, रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. यातच रुग्णालयात बेड मिळत नसल्याने एका कोरोनाबाधित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुण्यात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मृत महिला पुण्यातील वारजे परिसरात राहायला होती. आधीच एका आजाराने ग्रस्त असलेल्या या महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान, तिला अधिक त्रास होऊ लागला. ज्यामुळे तिने 12 एप्रिल रोजी पतीसोबत शहरातील अनेक रुग्णालयात जाऊन बेड मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु, त्यांना बेड मिळालाच नाही. यामुळे ती नैराश्यात गेली होती. दरम्यान, सोमवारी जेवण झाल्यानंतर ही महिला आपल्या खोलीत झोपायला गेली. मात्र, सकाळी बराच उशीर झाला तरी ती बाहेर न आल्याने तिच्या पतीने खोलीत जाऊन पाहिले. त्यावेळी ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिच्या पतीने तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. हे देखील वाचा- Coronavirus: मृत्यू प्रमाणपत्रांवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापा- नवाब मलिक
या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशीला सुरुवात केली. तसेच मृत महिलेने गळफास लावलेल्या खोलीची पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळी संबंधित महिलेने आत्महत्यापूर्वी लिहलेली सुसाईट नोट त्यांना सापडली. या सुसाईट नोटमध्ये आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले गेले आहे. आता त्या आधारे तपास सुरू असल्याचे वारजे पोलिसांनी सांगितले आहे. या संदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. पुण्यात काल (16 एप्रिल) तब्बल 10 हजार 963 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, 109 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णालयांवर ताण पडत असून, बेडचा तुटवडा जाणवत आहे.