IIT Bombay च्या वर्गात घुसला बैल, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासन अजूनही शांतच (Video)
मात्र आज चक्क वर्गात येण्यापर्यंत या जनावरांची मजल गेली आहे. वर्गात लेक्चर सुरु असताना एक भटका बैल वर्गात घुसला आणि सर्वत्र मोकाट फिरू लागला. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.
देशातील एक प्रतिष्ठित शिक्षण संस्था म्हणून आयआयटी मुंबई (IIT Bombay) ओळखले जाते. पवईसारख्या महत्वाच्या ठिकाणी या संस्थेचा डोलारा उभा आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून या परिसरात भटक्या गुरांनी (Stray Cattle) धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी एका भटक्या बैलाच्या धडकीत एक विद्यार्थी जखमी झाला होता. मात्र आज चक्क वर्गात येण्यापर्यंत या जनावरांची मजल गेली आहे. वर्गात लेक्चर सुरु असताना एक भटका बैल वर्गात घुसला आणि सर्वत्र मोकाट फिरू लागला. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.
सध्या या गोष्टीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. इतकी मोठी घटना घडली असूनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या त्रासाने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संस्थेने अशा रस्त्यावरील गायींसाठी निवारा उभा करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र यामध्ये अजूनतरी काही प्रगती नाही. (हेही वाचा: IIT Bombay मधील 21 वर्षीय विद्यार्थ्यावर बैलांचा हल्ला)
दरम्यान, मंगळवारी आयआयटी परिसरात एका मोकाट सुटलेल्या बैलाला पकडण्यात आले होते. गुरांचा कोंडवाडा विभागाने ही कारवाई केली होती. आयआयटी परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर आहे. अशा जनावरांचा त्रास झाल्यावर त्यांना पकडण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता चक्क वर्गात ही जनावरे घुसू लागली आहे आणि वर्गापर्यंत येताना त्यांना कोणीच अडवायचा प्रयत्न केला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संस्थेने याबाबत लवकरात लवकर काही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.