राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा; एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवली आरोग्य खात्याची जबाबदारी
राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते दीपक सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
राज्याचे आरोग्यमंत्री (Health Minister) आणि शिवसेनेचे प्रमुख नेते डॉ. दीपक सावंत (Deepak Sawant) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपल्याने त्यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्त केला. दीपक सावंत हे शिवसेनेचे मंत्री होते. यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2018 रोजीच संपली होती, त्यानंतरही ते मंत्रिपदावर कार्यरत होते. नवीन नावाबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती, ही संधी आपल्याला मिळावी म्हणून शिवसेना नेत्यांकडून जोरदार लॉबिंग करण्यात आली होती. आता आरोग्य खात्याची जबाबदारी शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
नवीन नावाबाबत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान दीपक सावंत यांनी 7 जून 2018 रोजीच आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांना सुपूर्त केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा थांबवत, पदावरच राहण्याचा सल्ला दिला.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली, यामुळे दीपक सावंत यांना शर्यतीतून माघार घ्यावी लागली. दीपक सावंत यांच्या कामाबाबत युवसेनेमध्ये नाराजी होती, त्यामुळे डॉ. सावंत यांना डावलून त्यांच्या जागी विलास पोतनीस यांची वर्णी लागली होती.