'एखाद्या महिलेचा पाठलाग करणे, शिवीगाळ करणे हा विनयभंगाचा गुन्हा नाही'- Bombay High Court

खटला संशयापलीकडे सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरल्याचे निकालात म्हटले आहे.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने महिलांवरील गुन्ह्यांबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. एका महिलेचा पाठलाग करणे, शिवीगाळ करणे आणि धक्काबुक्की करणे ही ‘उत्साही’ कृत्ये असल्याचे या निकालात म्हटले आहे. परंतु आयपीसीच्या कलम 354 नुसार अशी कृत्ये विनयभंगाचा गुन्हा नाहीत. तक्रारदाराचा पाठलाग करून शिवीगाळ करणे हे स्त्रीच्या शालीनतेच्या भावनेला धक्का पोहोचवणारे आहे, असे म्हणता येणार नाही. हे कृत्य त्रासदायक असले तरी स्त्रीच्या शालीनतेला धक्का बसणार नाही, असे निरीक्षण नागपूर खंडपीठाने नोंदवले.

या खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी अपीलकर्ता (मोहम्मद इजाज शेख इस्माईल- वय 36) या मजुराची निर्दोष मुक्तता केली. खटला संशयापलीकडे सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरल्याचे निकालात म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने या मजुराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये तिने सांगितले की, त्या व्यक्तीने तिचा अनेकवेळा पाठलाग केला. तसेच तिच्याशी गैरवर्तन केले. तिने पुढे सांगितले की, एकदा ती बाजारात जात असताना तो तिच्या मागे सायकलवरून गेला. नं तिला धक्का दिला. या प्रकरणात न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 9 मे 2016 रोजी त्या व्यक्तीला दोषी ठरवले. ज्यामध्ये त्याला दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पुढे सत्र न्यायालयाने 10 जुलै 2023 रोजी हा निकाल कायम ठेवला. (हेही वाचा: Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छत्रपती संभाजी नगर येथील धक्कादायक प्रकार, कॉफी कॅफेमध्येच मित्राकडून अल्पवयीन मैत्रीणीवर अत्याचार; नग्न फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी)

त्यानंतर मोहम्मद इजाज शेख इस्माईलने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. व्यक्तीचे अपील ऐकून हायकोर्टाने सांगितले की, ‘याचिकाकर्त्याने महिलेला अयोग्यरित्या स्पर्श केला आहे किंवा तिच्या शरीराच्या कोणत्याही विशिष्ट भागाला धक्का दिला आहे, हे स्पष्ट होत नाही. यामुळे हे कृत्य अपमानास्पद किंवा संतापजनक असू शकते, मात्र तिच्या शालीनतेला कोणताही धक्का पोहोचला नाही. सायकलवरून आलेल्या अर्जदाराने महिलेला धक्का दिला,  हे कृत्य तिच्या शालीनतेच्या भावनेला धक्का देणारे कृत्य म्हणता येणार नाही.’