St George’s Hospital: मुंबईत 40 वर्षीय अशक्त महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी काढला 10.4 किलोचा गर्भाशयातील ट्युमर

मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका गंभीर आजारी, कुपोषित 40 वर्षीय महिलेच्या शरीरातून 10.4 किलो वजनाचा गर्भाशयाचा ट्यूमर यशस्वीरित्या काढून टाकला. आरोग्याच्या बाबतीत मोठे धोके असूनही ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली.

St George’s Hospital: मुंबईत 40 वर्षीय अशक्त महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी काढला 10.4 किलोचा गर्भाशयातील ट्युमर
Surgery | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Government Hospital Treatment: मुंबईतील सरकारी सेंट जॉर्ज रुग्णालयात (St George’s Hospital Mumbai) एक अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (Critical Care Mumbai) यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेद्वारे मीना रावजी सोळंकी या 40 वर्षीय अशक्त महिलेच्या पोटातून तब्बल 10.4 किलोचा अंडाशयाचा ट्युमर (Ovarian Tumour) काढण्यात डॉक्टरांना यश आले. ही महिला सध्या क्रॉफर्ड मार्केट परिसराची रहिवासी असून, रूग्णालयात दाखल होताना तिचे वजन केवळ 20 किलो (ट्युमरचा वजन वेगळा धरून) होते.

पोटात सहा-सात बाळं?

मीना गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ पोटदुखीने त्रस्त होती. एका अपघातात पोट टेबलावर आपटल्याने तिला त्रास सुरू झाला. सुरुवातीला ती वेदना दुर्लक्षित करत राहिली, पण काळानुरूप त्रास वाढत गेला. तिचं पोट अतीप्रमाणात फुगू लागलं, वयाच्या 36 व्या वर्षी तिची मासिक पाळी बंद झाली आणि वजन झपाट्याने घटलं. 'असं वाटायचं जसं पोटात सहा-सात बाळं असावीत. शेजारी सुद्धा माझ्याकडे पाहायला घाबरायचे,' असं तिने सांगितलं. (हेही वाचा, New Rule Against Hospital Violence: रुग्णलय, डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात नवा कायदा; घटना घडल्यानंतर सहा तासांमध्ये FIR दाखल होणे बंधनकारक)

तोंडात फोड, उलट्यांचा त्रास

मे महिन्यात तिची प्रकृती आणखी बिघडली. तोंडात गंभीर फोड झाले, ती अन्न घेऊ शकत नव्हती आणि सलग आठ दिवस उलट्यांचा त्रास झाला. अविवाहित असलेल्या मीनाला स्थानिक डॉक्टरांकडून तात्पुरती मदत मिळत होती. अखेर एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने तिचा भाऊ तिला सेंट जॉर्ज रुग्णालयात घेऊन आला. (हेही वाचा, PresVu Eye Drops: ईटीओडी फार्मास्युटिकलचा परवाना निलंबित, अनधिकृत जाहिरातींवर बंदी)

चार तास शस्त्रक्रिया

स्कॅनमध्ये संपूर्ण पोट व्यापलेला प्रचंड ट्युमर आढळून आला. या वाढलेल्या गाठीने तिच्या यकृत, प्लिहा आणि आतड्यांसारख्या अवयवांना वेढले होते, ज्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होत होता. तिचं शरीर कमकुवत असल्याने शस्त्रक्रिया अतिशय धोकादायक होती. तरीही डॉक्टरांच्या टीमने चार तास चाललेल्या शस्त्रक्रियेत ट्युमर यशस्वीरीत्या काढला. या टीममध्ये ऑन्कोलॉजिस्ट डॉ. कोरेश, स्त्रियांच्या आरोग्यतज्ज्ञ डॉ. शुभांगी, तसेच अनेस्थेशिया डॉक्टर डॉ. पूर्णिमा सोनकांबळे आणि डॉ. रुची यांचा समावेश होता.

शस्त्रक्रियेनंतर मीनाला काही दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि त्यानंतर तिला सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. सध्या ती हाय-प्रोटीन डाएटवर असून, हळूहळू तिची ताकद आणि हालचाल परत येत आहे. ही घटना सरकारी रुग्णालयातही उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळू शकते याचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटल हे फोर्ट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ स्थित एक ऐतिहासिक बहु-विशेष सरकारी रुग्णालय आहे. मूळतः 1677 मध्ये ब्रिटिश राजवटीत युरोपियन रुग्णांना सेवा देण्यासाठी युरोपियन जनरल हॉस्पिटल म्हणून स्थापित केले गेले, नंतर 1892 मध्ये ते जनतेसाठी खुले करण्यात आले आणि जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचा भाग बनले. आज, ते विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा प्रदान करते आणि महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2025 02:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).