ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटण्याची शक्यता; मंत्री अनिल परब यांनी घेतली शरद पवारांची भेट, झाली महत्वाची चर्चा

या पर्यांयांचा एक सुधारीत प्रस्ताव परिवहन मंत्रालय आज तयार करत आहे

शरद पवार व अनिल परब (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRCT) कर्मचाऱ्यांचा संप आज शनिवारीही सुरु आहे. महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे (ST Employees Strike) राज्यातील सर्व 250 बस डेपो बंद आहेत. आता माहिती मिळत आहे की, शनिवारी सकाळी परिवहनमंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 10 मिनिटांची भेट झाली. या भेटीत हा संप कसा मिटवता येईल याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे.

गेल्या 15 दिवसांपेक्षा जास्त काळापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करावी ही एसटी कर्मचारी संघटना आणि कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याबाबत गुरुवारपासून मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या संख्येने कर्मचारी तळ ठोकून आहेत. या काळात सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. दुसरीकडे कर्मचारी आपल्या मतावर  ठाम राहिल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लवकरच, शरद पवार आणि राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एकत्र भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार साहेबांच्या कानावर घातले. इतर महामंडळांप्रमाणे सातवा वेतन एसटी महामंडळाला लागू करण्याची मागणी केली. केवळ एसटी प्रश्नावरच चर्चा केली. ते तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे.’ (हेही वाचा: मुंबई सेंट्रल बस स्थानकातून 'मुंबई-सातारा' बस रवाना; एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटणार?)

आजच्या परब-पवार यांच्या भेटीमध्ये, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी शरद पवार यांनी परिवहन मंत्र्यांना काही पर्याय सूचवले आहेत. या पर्यांयांचा एक सुधारीत प्रस्ताव परिवहन मंत्रालय आज तयार करत आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एमएसआरटीसीने शुक्रवारी राज्यात 36 बसेस चालवल्या. एमएसआरटीसी अधिकाऱ्यांनी याआधी दावा केला होता की काही कर्मचारी त्यांच्या कार्यशाळेत कामावर परतले आहेत.