SPPU कडून फी कपातीचा निर्णय; COVID-19 मुळे आई-वडील गमावलेल्यांना 100% फी कपात
आई-वडील दोघेही किंवा त्यांच्यापैकी एक व्यक्ती गमावली असेल तर त्यांच्यासाठी हा फी कपातीचा निर्णय केवळ या वर्षासाठी लागू असणार आहे.
कोरोना संकटामुळे मागील दीड-दोन वर्षांपासून शैक्षणिक वर्षांचं गणित विस्कटलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना या संकटाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात अजूनही यंदाच्या शैक्षणिक वर्षाला ऑनलाईन स्वरूपात सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे. ऑनलाईन शिक्षणासोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University) शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शुल्क कपातीचा निर्णय झाला आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या फी मध्ये 100% कपात करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. आई-वडील दोघेही किंवा त्यांच्यापैकी एक व्यक्ती गमावली असेल तर त्यांच्यासाठी हा फी कपातीचा निर्णय केवळ या वर्षासाठी लागू असणार आहे. नक्की वाचा: शासकीय, शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षात फीमध्ये मिळणार 25% सूट; मंत्री उदय सामंत यांची माहिती.
काही दिवसांपूर्वीच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला जाहीर केला आहे. दरम्यान आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थितीत नसलेल्या गरजू विद्यार्थ्यांना लेखी अर्ज केल्यानंतर त्यांना हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची देखील मुभा मिळणार आहे. तसेच वसतिगृह/ निवास शुल्क जेव्हा विद्यार्थी हे देखील महाविद्यालयांमध्ये येतील तेव्हाच घेतले जाईल असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान 12वी निकालानंतर आता पदवीधर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची लगबग सुरू झाली आहे. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि मुंबई विद्यापीठापाठोपाठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं फी कपातीचा निर्णय जाहीर केला आहे.