लवकरच NCP नेते करणार लोकसभा मतदारसंघांचा दौरा; तर मंत्री घेणार जनता दरबार

पुढील आठवड्यात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यामध्ये पक्ष संघटना वाढीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला जाईल.

Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

लवकरच महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते राज्यातील विविध भागात लोकसभा मतदारसंघनिहाय दौरे सुरू करणार आहेत, तर मंत्री लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी जनता दरबार (Janta Darbar) घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याचे तटकरे यांनी सांगितले.

तटकरे यांनी सांगितले की, आजच्या बैठकीमध्ये पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्यव्यापी उभे राहणारे संघटन अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. पुढील आठवड्यात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यामध्ये पक्ष संघटना वाढीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला जाईल, असेही ते म्हणाले. पुढील आठवड्यातील बैठकीनंतर पक्षाचे नेते दौऱ्याला सुरुवात करतील आणि नऊ मंत्री पुढील आठवड्यापासून प्रदेश पक्ष कार्यालयात जनता दरबार सुरू करतील, असे तटकरे यांनी सांगितले. (हेही वाचा: लोकसभेतील पंतप्रधानांच्या भाषणावर बहिष्कार टाकणाऱ्या शिवसेनेच्या 5 खासदारांवर होणार कारवाई; Rahul Shewale यांची माहिती)

दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि देशात जास्तीत जास्त जागा जिंकणे हे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) प्राधान्य असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले. युतीचे भागीदार सध्या यावरच काम करत आहेत. त्यानंतर ते राज्य विधानसभा निवडणुकांकडे (ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024 मध्ये होणार्‍या) आपले लक्ष वळवतील. ते पुढे म्हणाले की, प्रतिस्पर्धी पक्षांना पराभूत करणे हे आमचे ध्येय आहे. आता आम्ही 'जनधार' मिळवून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी काम करणार आहोत.