Sonu Nigam (Photo Credits: Instagram)

पद्मश्री सोनू निगम (Sonu Nigam) हा भारतातील प्रसिद्ध गायक आणि कलाकारांपैकी एक आहे. सोनू निगमचे लाईव्ह कॉन्सर्ट्स फक्त भारतातच नाही तर परदेशातही होत असतात. परदेशातही सोनू निगमचे अनेक चाहते आहेत. यामुळेच सोनू निगमकडे आंतरराष्ट्रीय मैफिलीच्या अनेक विनंत्या येत राहतात. आता माहिती मिळत आहे की, अशाचा एका कॉन्सर्ट्सशी निगडीत प्रकरणामध्ये सोनू निगम याला धमक्या मिळाल्या आहेत. महत्वाचे या धमक्या बीएमसी चीफ इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांचा चुलत भाऊ राजिंद्र याच्याकडून मिळाल्या असल्याचा दावा केला जात आहे.

अहवालानुसार, इक्बाल सिंग यांनी त्यांचा चुलत भाऊ राजिंदर याची ओळख सोनू निगमशी करून दिली. राजिंदर याने सोनू निगमला परदेशात एक कॉन्सर्ट्स करण्याची विनंती केली. सोनूच्या कॉन्सर्टचे डिटेल्स रॉकी नावाचा प्रमोटर हाताळतो, त्यामुळे सोनूने राजिंदरला रॉकीशी संपर्क साधण्यास सांगितले. कदाचित हीच गोष्ट राजिंदरला आवडली नसावी. त्यानंतर या आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टच्या मुद्द्यावरून राजिंद्र याने सोनू निगमला अपमानास्पद मेसेजेस पाठवले तसेच धमकीही दिली.

सूत्राने सांगितले की, ‘संदेशांमध्ये लिहिलेल्या अनेक गोष्टी धक्कादायक आहेत आणि ज्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. या संदेशांमध्ये राजिंदरने वापरलेली भाषा निंदनीय आहे व ज्यामुळे सोनुला धक्का बसला आहे.’ सोनू निगमने राजिंदरच्या मेसेजचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. राजिंदर हा मुंबईत इक्बाल सिंगसोबत राहत असल्याचीही माहिती मिळाली आहे. सोनू निगमशी संबंधित सूत्राने असेही सांगितले की, सोनू निगमने प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावे आणि पुन्हा असे होऊ नये म्हणून हे प्रकरण सार्वजनिक केले आहे. (हेही वाचा: सारा अली खान, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर ED च्या रडारवर; Sukesh Chandrashekhar ने केले होते टार्गेट, तपासात मोठा खुलासा)

इक्बाल सिंग चहल यांच्याबद्दल तसेच ते मुंबईसाठी करत असलेल्या कामाबद्दल सोनू निगमला प्रचंड आदर आहे आणि त्यामुळेच त्याने घडल्या प्रकाराबाबत कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सूत्राने असेही सांगितले की, राजिंद्रने गायिका पलक चहललाही धमकी दिली होती. यापूर्वी पलक चहलच्या आईला धमकीचे मेसेज देण्यात आले होते. सुत्राने सांगितले की सोनूजी अशा अनेक लोकांना ओळखतो ज्यांना राजींद्रने धमकीचे संदेश पाठवले आहेत.