सोनिया गांधींनी घेतली मवाळ भूमिका; कॉंग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीशी चर्चा करण्यास संमती, आज ठरणार नवा फॉर्म्युला?
गेल्या काही दिवसांपासून तीनही पक्षांमध्ये चर्चा चालू आहेत. अशात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आपल्या नेत्यांना राष्ट्रवादीशी चर्चा करण्यास सांगितले आहे.
येत्या 24 नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तब्बल 1 महिना पूर्ण होईल. अजूनही महाराष्ट्रात सत्ता स्थापन न झाल्याने तळागाळातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आणि शिवसेनेची महायुती ऐनवेळी तुटल्याने, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची पटावर एन्ट्री झाली. गेल्या काही दिवसांपासून तीनही पक्षांमध्ये चर्चा चालू आहेत. अशात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आपल्या नेत्यांना राष्ट्रवादीशी चर्चा करण्यास सांगितले आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार ही महत्वाची बैठक आज, बुधवारी पार पडणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या या बैठकीकडे लागले आहे.
कॉंग्रेसचे अनेक नेते आणि आमदार शिवसेनाला पाठींबा देण्यास अनुकूल आहेत. हीच गोष्ट सोनिया गांधी यांच्यासमोर मांडण्यात आली. तसेच शिवसेनाला पाठींबा दिल्याने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकतो. दोन्ही पक्षांची रणनीती ठरवताना, एकदा किमान समान कार्यक्रम नक्की केल्यानंतर पुढे जास्त समस्या उद्भवणार नाहीत हेही सोनियाजींना पटवून देण्यात आले. या सर्व गोष्टींचा विचार करून सोनिया गांधींनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. आज राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी चर्चा झाल्यानंतर, शिवसेनेशी चर्चा होईल आणि अधिकृत फॉर्म्युला जाहीर करण्यात येईल.
(हेही वाचा: आधार, पॅनकार्ड, पाच दिवसांचे कपडे घेऊन मुंबईत हाजीर हो.., शिवसेना आमदारांना पक्षनेतृत्वाचे आदेश)
आज पार पडणाऱ्या या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के.सी.वेणुगोपाल आणि राज्यातील काही नेते मंडळी सहभागी होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील सहभागी होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली. दुसरीकडे शिवसेना आमदारांना (Shiv Sena Legislators) पॅनकार्ड, आधार कार्ड आणि पाच दिवस पुरतील इतके कपडे घेऊन मुंबईकडे रवाना होण्याचे आदेश पक्षनेतृत्वाने दिल्याचे वृत्त आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या सर्व आमदारांची एक बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडणार आहे.