राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत आमदार दिलीप सोपल म्हणणार 'जय महाराष्ट्र', 28 ऑगस्ट रोजी करणार शिवसेना प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक हजरजबाबी, विनोदी आणि दिलखुलास व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख आहे. प्रसंग कितीही बाका, अडचणीचा आणि बिकट असला तरी दिलीप सोपल हे त्यातून सहज मार्ग काढण्यात पटाईत आहेत. त्यांच्या भाषणात विनोदाची पेरणी असते. त्यामुळे त्यांच्या भाषणाचे राजकारण आणि राजकारणाबाहेरही अनेक चाहते पाहायला मिळतात.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे बार्शी येथील आमदार दिलीप सोपल (MLA Dilip Sopal) हे शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश करणार आहेत. आपले समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोमवारी (26 ऑगस्ट 2019) घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सोपल यांनी आपल्या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमं आणि कार्यकर्त्यांना दिली. आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. सोपल यांच्या राष्ट्रवादी सोडण्याने केवळ पक्षच नव्हे तर, खुद्द शरद पवार यांनाही धक्का बसणार आहे. आमदार सोपल हे येत्या 28 ऑगस्ट 2019 रोजी शिवसेना पक्षात प्रवेश करतील.
आमदार दिलीप सोपल यांना राज्याच्या राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक हजरजबाबी, विनोदी आणि दिलखुलास व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख आहे. प्रसंग कितीही बाका, अडचणीचा आणि बिकट असला तरी दिलीप सोपल हे त्यातून सहज मार्ग काढण्यात पटाईत आहेत. त्यांच्या भाषणात विनोदाची पेरणी असते. त्यामुळे त्यांच्या भाषणाचे राजकारण आणि राजकारणाबाहेरही अनेक चाहते पाहायला मिळतात.
आमदार दिलीप सोबल यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकता सोपल यांनी कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी बंडखोर उमेदवार म्हणून निवडणुका लढवल्या आहेत. दिलीप सोपल हे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात. अनेकदा जाहीर व्यासपीठावरुन बोलताना सोपल यांनी शरद पवार हेच आमचा पक्ष अशी भूमीका मांडली आहे. (हेही वाचा, विधानसभा निवडणूक 2019: शिवसेना-भाजप युती जागावाटप करणार कोण? उद्धव ठाकरे यांनी सांगितली तीन नावे)
दिलीप सोपल यांनी विधी व न्याय, पाणी पुरवाठा आदी खात्यांचे मंत्री म्हूणन काम पाहिले आहे. बार्शी उपसा सिंचन योजना, भीमा सीना जोड कालवा योजना आदी प्रकल्पांवर त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. या कामाचे श्रेयही त्यांना मिळाले. त्यांच्या प्रयत्नामुळे बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बरेच काम झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठा तोटा तर शिवसेनेला चांगलाच फायदा होणार आहे.