Mumbai: आईवर अत्याचार करणाऱ्या बापाच्या डोक्यात हातोडा घालून केली हत्या, मुंबईच्या दहिसर परिसरातील धक्कादायक घटना

ही घटना मुंबईच्या (Mumbai) दहिसर (Dahisar) परिसरात घडली आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

आईवर अत्याचार करणाऱ्या बापाची पोटच्या मुलाने हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईच्या (Mumbai) दहिसर (Dahisar) परिसरात घडली आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृत वडिलांकडून आईवर सतत होणारा अत्याचार न बघवल्याने तरुणाने थेट बापाची हत्या केली आहे.

अण्णाराव बनसोडे (वय, 60) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अण्णाराव बनसोडे हे एक बांधकाम मजूर असून त्यांना दारू व्यसन होते. अण्णाराव हे दारू पिऊन घरी आल्यानंतर दररोज पत्नीला आणि मुलांना शिवीगाळ आणि मारहाण करायचे. घटनेच्या दिवशी अण्णाराव हे दारू पिऊन घरी आले होते. यावेळी आरोपी मुलगा संदीप उर्फ बाळा अण्णाराव बनसोडे याने त्याचे वडील अण्णाराव यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण अण्णाराव यांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. वडिलांच्या या कृत्यामुळे संतापलेल्या संदीपने जवळच पडलेल्या एका हातोड्याने बापाच्या डोक्यात जबरी वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अण्णाराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Pimpri Chinchwad: सुनेचा छळ केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर मंगला कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ माजली आहे.