Gram Panchayat Election 2021: रायगड मध्ये ग्रामपंचायतीवर फडकला भगवा झेंडा, शिवसेनेच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड
त्यामुळे धुळे पाठोपाठ रायगडमध्येही ग्रामपंचायतीवर भगवा फडकला असून विजयाचा गुलाल उधळला आहे.
Gram Panchayat Election 2021: राज्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणूकांचे बिगुल वाजणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे लांबणीवर पडलेल्या 34 जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या 15 जानेवारी 2021 रोजी मतदान तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच रायगड जिल्ह्यातील (Raigad District) ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. रायगडमध्ये 9 पैकी शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे धुळे पाठोपाठ रायगडमध्येही ग्रामपंचायतीवर भगवा फडकला असून विजयाचा गुलाल उधळला आहे.
रायगड जिल्ह्यातील खानावळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Khanawale Gram Panchayat Election) अर्ज भरण्यात आले आहे. परंतु, 9 पैकी शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे, त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे, असं वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिलेले आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Gram Panchayat Election 2021: राज्यातील 34 जिल्ह्यांत 14,234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान, 18 तारखेला मतमोजणी
त्यामुळे आता उर्वरित 3 जागांसाठी आता निवडणूक लढवली जाणार आहे. शिवसेनेचे जास्त सदस्य बिनविरोध निवडून आल्यामुळे शिवसेनेचा विजय हा निश्चित मानला जात आहे. याची अधिकृत घोषणा ही निवडणूक निकालानंतर होणार आहे. पण त्याआधीच शिवसैनिकांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती देताना आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.