ShivSrushti At Raigad Fort: किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात उभारण्यात येणार 'शिवसृष्टी'; शिंदे सरकार देणार 50 कोटींचा निधी

आम्ही राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार आहोत. स्वराज्याची सुरुवात करणाऱ्या या सोहळ्यात महाराष्ट्राचा पाया आहे. शिवाजी महाराज हे त्यांच्या न्यायप्रणालीसाठी ओळखले जातात, त्यामुळे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी आमची मागणी आहे, असंही फडणवीस म्हणाले.

CM Eknath Shinde (PC - Twitter/CMO)

ShivSrushti At Raigad Fort: छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या प्रतापगड किल्ल्यासाठी संवर्धन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून मराठा राजाच्या इतिहासाच्या संशोधन आणि प्रचारासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या शिवसृष्टी (ShivSrushti) साठी 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत. किल्ले रायगडावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या (Shivaji Maharaj’s Coronation) 350 व्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपणही करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या दूरदृष्टीमुळे इतर ऐतिहासिक वीरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक किल्ल्यावर सहा दिवस चालणाऱ्या उत्सवाची घोषणा करताना त्यांच्या थेट व्हिडिओ-संबोधनात सांगितले. त्यांनी छत्रपतींच्या लोककल्याणकारी आणि शासनाच्या चारित्र्यावर प्रकाश टाकला. शिवरायांनी स्वराज्य, धर्म, संस्कृतीचा वारसा जपला. शिवाजी महाराजांमुळे लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि स्वावलंबनाची भावनाही वाढली, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - Mumbai: खुशखबर! मुंबईत दिव्यांग आणि महिलांना उपलब्ध होणार मोठ्या प्रमाणावर रोजगार; मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आदेश)

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचारधारा आणि न्यायाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यांची धाडसी कार्यशैली, धोरणात्मक कौशल्य आणि शांततापूर्ण राजकीय व्यवस्था आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. शिवाजी महाराजांनी कधीही जाती-पातीचा भेदभाव होऊ दिला नाही आणि नेहमीच महिलांच्या विकासाला चालना दिली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले तसेच इतर लोकप्रतिनिधी, मान्यवर तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, दिल्ली येथे शिवाजी महाराजांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य प्रयत्नशील आहे. आम्ही राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार आहोत. स्वराज्याची सुरुवात करणाऱ्या या सोहळ्यात महाराष्ट्राचा पाया आहे. शिवाजी महाराज हे त्यांच्या न्यायप्रणालीसाठी ओळखले जातात, त्यामुळे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी आमची मागणी आहे, असंही फडणवीस म्हणाले.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं की, शिवाजी महाराजांचे विचार राज्यभर पोहोचविण्याची जबाबदारी विभागाने घेतली आहे. त्यांच्या विभागाने शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक गॅझेटियर प्रकाशित केले आहे. इंग्लंडमधून त्यांची जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.