Shiv Sena Vs BJP: शिवसैनिक करत असलेली तोडफोड ही सरकार स्पॉन्सर्ड- देवेंद्र फडणवीस
नारायण राणे यांनी बोलण्याच्या भरात मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य केले. ते अयोग्य असले तरी त्यांच्या मनात मुख्यमंत्र्यांबाबत अशी काही भावना असेल असे मला वाटत नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
शिवसैनिक (Shiv Sainik) करत असलेली तोडफोड ही सरकार स्पॉन्सर्ड आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी बोलण्याच्या भरात मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य केले. ते अयोग्य असले तरी त्यांच्या मनात मुख्यमंत्र्यांबाबत अशी काही भावना असेल असे मला वाटत नाही. मुख्यमंत्री पद हे नक्कीच सन्मानित आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या वक्तव्याबाबत भारतीय जनता पक्ष सहमत नसेल. पण राज्य सरकार राणे यांच्याबाबत जी कारवाई करण्यास निघाली आहे त्याच्या विरोधात भाजप त्यांच्यासोबत आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सरकारची नारायण राणे यांच्याबाबतची भूमिका म्हणजे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारण्याचा प्रकार आहे.
नारायण राणे यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पक्ष कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. परंतू, त्यांच्या वक्तव्यावरुन राज्य सरकार ज्या प्रकारे कारवाई करत आहे ती बेकायदेशीर आहे. मुळात नारायण राणे यांनी जे विधान केले आहे ते कायद्याच्या भाषेत गुन्हा नाही. ते विधान इनकॉग्निबल आहे. त्यामुळे इनकॉग्निबल असलेल्या विधानाला जर काग्निबल करुन कारावाई केली जात असेल तर ते चुकीचे आहे. नारायण राणे यांच्यावर ज्या पद्धतीची कलमे लावली आहेत. त्या कलमांकडे पाहिले तर त्या कलमानुसार आगोदर त्यांचा जवाब घेतला जाईल. त्यानंतरच पुढची कारवाई करावी लागेल, असेही देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. (हेही वाचा, Jayant Patil: 'राजकारणाचा स्तर घसरला नाही, काही लोकांचा स्तर घसरला आहे'; जयंत पाटील यांचा नारायण राणे आणि भाजपला टोला)
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर जर हल्ला करण्यात आला तर खबरदार. भाजप हे कदापीही सहन करणार नाही. ज्या ज्या ठिकाणी कार्यालयांवर (भाजप) हल्ले झाले आहेत त्या ठिकाणी मी आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जाऊन तिथल्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊ.
ट्विट
भारतीय जनता पक्षाच्या जन आशीर्वाद यात्रेला अडविण्यासाठीच मुद्दाम प्रयत्न केले जात आहेत. परंतू काही झाले तर जन आशीर्वाद यात्रा सुरुच राहिल. संपूर्ण देशभरात महाराष्ट्र पोलिसांची एक प्रतिमा होती. परंतू, आजचे सरकार पोलीसजीवी झाल्याच पाहायला मिळत आहे. त्यामुळे माझे पोलिसांना इतकेच सांगणे आहे की, कायद्याचे पालन करा. जे पोलीस बेकायदेशीर काम करत होते ते आज कोठे आहेत हे पाहा इतकेच मी सांगेन असेही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी म्हटले.