Shiv Sena (UBT) Campaign Ad: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काल पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे गटाच्या (UBT) निवडणूक प्रचार जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर केला असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी वाघ यांनी राज नयनी (Actor Raj Nayani) या अभिनेत्याचा फोटो पुरावा म्हणून सादर केला आणि दावा केला की ही व्यक्ती ‘उल्लू’ ॲपवर मुलींसोबत घाणेरडे कृत्य करताना दिसत आहे. अशा व्यक्तीला घेऊन ठाकरे गटाने आपली जाहिरात बनवली. त्यानंतर आता अभिनेता राज नयनी यांनी चित्रा वाघ यांनी आपला ‘पॉर्न स्टार’ असा उल्लेख केल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका केली.
अनेक टीव्ही शो, वेब सिरीज आणि अगदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्याने वाघ यांच्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली. याशिवाय, वाघ यांनी आपली माफी मागितली नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली. येत्या दोन दिवसांत त्यांनी माझी माफी मागावी, अन्यथा, अब्रुनुकसानी दावा दाखल करणार, असा इशारा त्यांनी दिला.
एबीपी माझा मधील एका वृत्तानुसार, वाघ यांनी आपले विधान मागे घ्यावे किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असा आग्रह नयनी यांनी धरला आहे. वाघ यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेला फोटो हा वेब सिरीजमधील भूमिकेतील असून, तो फोटो त्यांच्या वैयक्तिक व्यक्तिरेखेचे सूचक नसल्याचेही नयनी यांनी स्पष्ट केले. राजकीय फायद्यासाठी वाघ यांनी आपली प्रतिष्ठा खराब केल्याचा आरोप नयनी यांनी केला. (हेही वाचा: Shiv Sena (UBT) Campaign Ad: शिवसेना ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये उल्लू वेब सिरीजमधील 'Porn Star' चा वापर? भाजप नेत्या Chitra Wagh यांचे आरोप, पुरावा म्हणून शेअर केला फोटो)
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका राजकीय जाहिरातीवरून भाजपने टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत, सेनेच्या यूबीटी गटाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये दिसणारा अभिनेता राज नयनी हा पॉर्न स्टार असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी अशा माणसाला घेऊन त्यांनी (ठाकरे गटाने) महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली? तसेच ही जाहिरात कंपनी आणि उद्धव ठाकरे यांचे काही संबंध आहेत का? असे प्रश्नही उपस्थित केले.