Maharashtra Political Crisis: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत जावं, मला मंत्री केलं नाही तरी चालेल, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
पक्ष सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याशी फोनवर चर्चा करून अनेक अटी त्यांच्यासमोर ठेवल्या.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठे विधान केले आहे. मी हिंदुत्वाला पाठिंबा देतो, असे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगितले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्षाने पुन्हा भाजपसोबत (BJP) जावे. पक्ष सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याशी फोनवर चर्चा करून अनेक अटी त्यांच्यासमोर ठेवल्या. आपण असं काय केलं की ठाण्यामध्ये आपल्या विरोधात नाराजी पसरवली जातेय असंही भावूक होऊन त्यांनी विचारलं असल्याची माहिती आहे. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंबईत या, चर्चा करु असा संदेश दिला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शिंदेंना परत येण्याचं आवाहन
एकनाथ शिंदे यांचे हे बोलण ऐकून मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना धीर दिला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना परत येण्याचं आवाहन केलं. "तुम्ही परत या आपण चर्चा करु. आपण भेटून बोलू" असं मुख्यमंत्री म्हणाले. पण तरीही शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे वचन मागितलं. "मला तुमच्याकडून आश्वासन पाहिजे की आपण पुन्हा भाजपासोबत युती करु", असं शिंदे मुख्यमंत्र्यांना म्हणाले. तसेच, आपण कोणत्याही पक्षासोबत चर्चा केली नाही, कोणत्याही कागदावर सह्या केल्या नाहीत असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचीही तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. (हे देखील वाचा: Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस पुन्हा होवु शकतात मुख्यमंत्री, पण कसे? एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचे आकडे काय सांगतात, घ्या जाणून)
नार्वेकर आणि शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा
शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर हे गुजरातच्या सूरत शहरात शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते. शिंदे सूरतमधील ली-मेरिडीअन या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आपल्या समर्थक आमदारांसह थांबले आहेत. शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर हे गेले होते. यावेळी नार्वेकर आणि शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पंधरा मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केली.