BJP On Shiv Sena: 'शिवसेना खासदार गद्दार, खोकेबहाद्दर', भाजप पदाधिकाऱ्याच्या आरोपाने युतीत तणाव, एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता
उद्धव ठाकरे गटाकडून आगोदर शिंदे गटातील आमदार, खासदारांवर गद्दारीचा शिक्का मारला गेला आहे. हे कमी होते की काय त्यामुळे आता भाजपकडूनही खासदार हेमंत गोडसे यांच्याबद्दल अशाच प्रकारच्या शब्दांचा उल्लेख झाल्याने शिंदे गटात कमालीची अस्वस्थता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) हे आगामी निवडणुका एकत्र लढण्याच्या आनाभाका घेत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे, फडणीस यांची भेट झाल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. असे असतानाच भारतीय जनता पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याकडून शिंदे गटातील खासदाराला चक्क 'गद्दार' आणि 'खोकेबहाद्दर' अशी उपाधी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आगोदर शिंदे गटातील आमदार, खासदारांवर गद्दारीचा शिक्का मारला गेला आहे. हे कमी होते की काय त्यामुळे आता भाजपकडूनही खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्याबद्दल अशाच प्रकारच्या शब्दांचा उल्लेख झाल्याने शिंदे गटात कमालीची अस्वस्थता आहे.
भाजप नेते आणि नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर दिनकर पाटील यांनी हेमंत गोडसे यांचा चक्क 'गद्दार' आणि 'खोके बहाद्दर' असा उल्लेख करण्यात आला आहे.
भाजप-शिवसेना युतीत वादाची ठिणगी
भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांच्या मतदारसंघातही भाजपने संयोजक नियुक्त केला आहे. त्यामुळे शिंदे गटात चांगलीच अस्वस्थता आहे. त्यातच स्थानिक पतळीवर टीका करताना गोडसे यांचा उल्लेख थेट 'गद्दार' आणि 'खोके बहाद्दर' असा केल्याने शिवसेना-भाजप युतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. दोन्ही गटात उफाळलेला सोशल मीडियावरील हा वाद नेतृत्वांनी लक्ष घालून थांबवला नाही तर विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
हेमंत गोडसे हे खासदार असलेल्या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. त्यामुळेच भाजपने देवयांनी फरांदे यांना संयोजक म्हणून मतदारसंघात जबाबदारी दिली आहे. भाजप स्थानिक पातळीवर जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहे. त्यातच 'दिनकर पाटील फॅन क्लब' या सोशल मीडिया पेजवर गोडसे यांच्या नावाचा थेट उल्लेख करत जोरदार टीका करण्यात आली आहे. विडंबनात्मक काव्य आणि थेट 'गद्दार' आणि 'खोके बहाद्दर' असा उल्लेख करण्यात आल्याने शिंदे गटातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत.