Shiv Sena On BJP: हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? शिवसेनेचा भाजप सरकारला सवाल

'हे असे प्रकरण प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने देशभर आंदोलन पुकारले असते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?', असा सवालही शिवसेनेने मुखपत्रातून विचरला आहे.

Shiv Sena chief Uddhav Thackeray | (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) झालेल्या लखीमपूर खेरी हिंसाचारावरुन (Lakhimpur Kheri Violence) शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना (Saamana Editorial) संपादकीयातून केंद्र सरकार, भाजपा (BJP) आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 'हे असे प्रकरण प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने देशभर आंदोलन पुकारले असते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?', असा सवालही शिवसेनेने मुखपत्रातून विचरला आहे.

काय म्हटले आहे सामना संपादकीयात?

'प्रियंका गांधी यांना योगी सरकारने अखेर अटक केली आहे. मागील ३६ तासांपासून त्यांना सीतापूरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ज्या घाणेरड्या जागेत प्रियंका गांधी यांना नजरकैद करून ठेवले होते त्या जागेत प्रियंकांना स्वतः साफसफाई करावी लागत होती. हातात झाडू घेऊन कचरा काढणाऱ्या प्रियंकांचा एक व्हिडीओ जगभरात व्हायरल झाल्याने आपल्या देशाची छिःथू होत आहे. प्रियंका गांधी या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर राजकीय हल्ले होऊ शकतात, पण देशासाठी असीम त्याग करणाऱ्या व पाकिस्तानचे तुकडे करून भारताच्या फाळणीचा सूड घेणाऱ्या महान इंदिरा गांधींच्या त्या ‘नात’ आहेत, यांचे तरी भान प्रियंकांना बेकायदेशीरपणे कैद करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते.' (हेही वाचा, Shiv Sena on Congress, BJP: भाजपलाही जिंकण्यासाठी काँग्रेसचे टॉनिक लागते- शिवसेना)

'कैदखान्यातून प्रियंका गांधींनी मोदी सरकारला जळजळीत प्रश्न विचारला आहे, ‘‘माझा अपराध काय? कोणत्याही वॉरंटशिवाय, एफआयआरशिवाय मला डांबून का ठेवले? शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे काय?’’ प्रियंका गांधी या लखीमपूर खेरीत सर्वप्रथम पोहोचल्या. चिरडून मारलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास त्यांना भेटायचे होते. प्रशासनाने प्रियंका यांना नुसतेच रोखले नाही, तर त्या मुलीस धक्काबुकी करून गाडीत कोंबले. प्रियंका गांधी या झुंजार आणि लढाऊ आहेत. त्या गप्प बसल्या नाहीत. त्यांच्या डोळय़ांत आणि आवाजात इंदिरा गांधींची धार आहे. सीतापूरच्या तुरुंगातूनही त्यांनी संघर्ष सुरूच ठेवला आहे.'

'उत्तर प्रदेशातील शेतकरी हत्याकांडाचे पडसाद जगभर उमटले आहेत. सरकारने कोणाचेही, कसेही मुडदे पाडायचे व विरोधकांनी त्यावर आवाज उठवला तर त्यांचे गळे आवळायचे. ज्यांना मारले त्यांच्या नातेवाईकांनी अश्रू ढाळले, हुंदके दिले, तर त्या नातेवाईकांवरही उद्या सरकार उलथविण्याचे कट रचले म्हणून खटले दाखल केले जातील. लखीमपूर खेरीत केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांचे हत्याकांड घडवले त्या मंत्रीपुत्रास वाचवण्याचे प्रयत्न योगींच्या पोलिसांनी केले. ‘‘तो मी नव्हेच, मी तेथे नव्हतोच,’’ असा आव मंत्रीपुत्राने आणला. पण आता शेतकऱ्यांवर घुसवलेल्या गाडीचा व्हिडीओच समोर आला. त्यामुळे सरकार काय करणार?'

'हे असे प्रकरण प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने देशभर आंदोलन पुकारले असते. प्रियंका गांधींना ज्याप्रमाणे अपमानित करून धक्के मारले हे भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडले असते तर महाराष्ट्रातील भाजपची महिला फौज फुगडय़ा घालत रस्त्यावर उतरली असती. महिलांवरील अत्याचाराची स्वतंत्र व्याख्या भाजपाने केली असून त्या व्याख्येत इंदिरा गांधींच्या नातीवर झालेला हल्ला बसत नाही'.

'लखीमपूर खेरीत जाण्यापासून छत्तीसगढ, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही योगी सरकारने रोखले आहे. हे काय भारत-पाकिस्तान युद्ध सुरू आहे काय? आपल्याच देशातील दोन मुख्यमंत्र्यांना लखनौत उतरण्यापासून रोखले जाते. हा संघराज्यातील एक विचित्र प्रकार घडला आहे. लोकशाहीचा असा गळा आणीबाणीच्या काळातही कधी घोटला नव्हता. आज जे घडले आहे ते भयंकर आहे. लखीमपूरची लढाई राजकीय नसून जगभरातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्काची बनली आहे. ब्रिटिश काळात लाला लजपतराय हे शेतकऱ्यांचे नेते ब्रिटिश जुलुमाविरुद्ध रस्त्यावर उतरले. त्यांच्यावर निर्घृण हल्ला ब्रिटिशांनी केला. त्यातच लालाजींचा मृत्यू झाला. जालियनवाला बागेत शेतकऱ्यांवर गोळय़ा चालवणारा जनरल डायर ब्रिटिश होता. मुंबईत परदेशी कापडाविरोधात आंदोलन करणाऱ्या बाबू गेनूच्या अंगावरून ट्रक नेणाराही ब्रिटिश होता. पण लखीमपुरात हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घालणारा स्वतंत्र भारतामधील केंद्रीय मंत्र्याचा पुत्र आहे'.

'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हे सर्व घडले आहे. शेतकऱ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान दिले सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली ‘बार्डोलीचा सत्याग्रह’ का केला, हे शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. गांधीजींनी मिठापासून परदेशी कपडय़ांपर्यंत केलेली आंदोलने शेतकऱ्यांच्याच बलिदानाने यशस्वी झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांचीच पोरे शहीद झाली व आज देशाच्या सीमेवरही शेतकऱ्यांचीच पोरे मरत आहेत. त्या जवानांच्या कुटुंबांवर भरधाव गाडय़ा घालून मारण्याचे पाप सरकार करीत असेल तर ‘देश खतरे में है!’ असे मानावेच लागेल. शेतकऱ्यांना काय हवे? तीन कृषी कायद्यांवर फेरविचार व्हावा असे त्यांना वाटते, पण सरकार ऐकायला तयार नाही. केंद्र सरकारला शेतीचे खासगीकरण करून मर्जीतल्या उद्योगपतींना देशातील शेतजमीन द्यायची आहे. सर्व सरकारी संपत्ती खासगी लोकांना विकून टाकल्यावर आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे. त्या मनमानीविरोधात शेतकरी उभा ठाकला आहे'.

'पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे ऐकायला हवे. कायदे हे जनतेसाठी केले जातात. जनता कायद्यासाठी जन्माला येत नाही. कायदे मोडून, कायदेभंग करूनच गांधीजींनी स्वातंत्र्याचे आंदोलन पेटविले हे विसरू नका. प्रियंका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. त्यांना अटक करून त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो भ्रम आहे. त्यांच्या या भ्रमाचा भोपळा उद्या फुटल्याशिवाय राहाणार नाही. देशाचे खासगीकरण सुरू झाले आहे. नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देश सोपवला जाऊ नये यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा व्हिडीओच समोर आला आहे. आता तरी दोन अश्रू ढाळा! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांडय़ा उडाल्या. हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?, असा सवाल शिवसेना मुखपत्रातून विचारण्यात आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now