महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना सुपूर्त केला AB Form; 3 ऑक्टोबरला भरणार वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज

मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना एबी फॉर्म दिला असून ते 3 ऑक्टोबर 2019 रोजी ते वरळी विधानसभा मतदार संघामधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यंदा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची अधिकृत घोषणा काल (30 सप्टेंबर) संजय राऊत यांनी केल्यानंतर आज त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना एबी फॉर्म दिला असून ते 3 ऑक्टोबर 2019 रोजी ते वरळी विधानसभा मतदार संघामधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काल संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुंबईच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.  शिवसेना - भाजप युतीची घोषणा होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्याकडून विजय शिवतरे सह 14 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप

आदित्य ठाकरे यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाकरे घरातील व्यक्ती निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. ठाकरे घराण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेकदा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संबंध आला आहे. पण अद्याप ठाकरे घराण्यातील कोणीही थेट निवडणूक लढली नाही तसेच कोणतेही संविधानिक पद सांभाळले नाही. मात्र आता आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरून आपल्या मतांचा जोगवा मागणार आहेत. शिवसेना पक्षाकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी

ANI Tweet  

आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांमध्ये जन आशिर्वाद यात्रा केली, त्याच्याद्वारा त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. सध्या वरळी विधानसभा संघातून सुनिल शिंदे हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. तर या मतदार संघात त्यांना कडवी टक्कर देणारे राष्ट्रवादीचे सचिन अहिर देखील शिवसेनेमध्ये दाखल झाल्याने आता आदित्य समोर राष्ट्रवादी कोणता उमेदवार उभा करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.