'ईडी'ने कोथळा वाचविण्यासाठी खलिता पाठवून बारामतीकरांशी तह केला: शिवसेना
महाराष्ट्र राज्य बँक घोटाळा प्रकरणीक शरद पवार यांचे आलेले नाव, दाखल झालेला गुन्हा आणि ईडीची कार्यपद्धती त्यावरुन शरद पवार यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर घडलेले अजित पवार नाराजी नाट्य यांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
‘‘दादा, कुछ तो गडबड है!’’, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आमदारकी राजीनामा आणि नाराजीनाट्यावर शंका उपस्थित करत टिकास्त्रही सोडले आहे. सोबतच 'ईडी'ने कोथळा वाचविण्यासाठी खलिता पाठवून बारामतीकरांशी तह केला' असे म्हणत अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) कार्यपद्धीतीवरही खोचक शब्दांत बाण सोडले आहेत. शिवसेना मुखपत्र 'दै. सामना' (Daily Saamana) मध्ये लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी हे टिकास्त्र सोडले आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले आह की, “अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल, तर त्या संघर्षाच्या दिवशी ते पवारांबरोबर कुठेच दिसले नाहीत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते पाहिल्यावर वाटते, ‘‘दादा, कुछ तो गडबड है!,’’
काय म्हटले आहे 'सामना'त?
कोथळा वाचवण्यासाठी ईडीने तह केला
महाराष्ट्र राज्य बँक घोटाळा प्रकरणीक शरद पवार यांचे आलेले नाव, दाखल झालेला गुन्हा आणि ईडीची कार्यपद्धती त्यावरुन शरद पवार यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर घडलेले अजित पवार नाराजी नाट्य यांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख ‘ईडी’ने करताच पवार यांनी ‘ईडी’ कार्यालयाच्या दिशेने कूच करण्याचे ठरवले. त्यासाठी युद्धाचे नगारे वाजवले, शंख फुंकले, रणभेदी आरोळ्या व धुरळ्याने आसमंत गढूळ झाला. ‘महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही’ अशा मराठीजनांस प्रिय असलेल्या संवादफेकीने शरद पवार यांनी माहौल मस्त तयार केला. महाराष्ट्रातून असंख्य वतनदार खाशा फौजा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांना मुंबईच्या वेशीवरच पोलिसांनी रोखले. शुक्रवारी दुपारी दोन वाजता ‘ईडी’रूपी अफझलखानाचा कोथळा काढायचाच असे ठरले. पण ‘ईडी’नेच कोथळा वाचविण्यासाठी बारामतीकरांना खलिता पाठवून ‘तह’ केला व त्या सर्व प्रकरणावर पडदा पाडला,”, अशा शब्दांत शिवसेनेने ईडीवर निशाणा साधला आहे. (हेही वाचा, बँक घोटाळा प्रकरण व शरद पवार यांना होत असलेला त्रास यांमुळे राजीनामा; अजित पवार यांची माहिती)
‘‘दादा, कुछ तो गडबड है!’’
दरम्यान, अजित पवार यांच्या राजीनामानाट्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, “निवडणुका वगैरे आल्या की, राजकारणात वावटळी उठत असतात. श्री. शरद पवार यांनी महाराष्ट्रात अशीच एक वावटळ उठवून दिली. वावटळीचे रूपांतर वादळात होईल, असे वाटत असतानाच पुतणेसाहेब अजित पवार हे आधी अचानक अदृश्य झाले, आमदारकीचा राजीनामा दिला व दुसऱ्या दिवशी प्रकट होऊन त्यांनी आपल्या अदृश्य होण्यामागची कहाणी पत्रकारांना सांगितली. अजित पवारांनी हे सर्व त्याच दिवशी अचूक वेळ साधून का केले? काकांचे एक वीररस नाटय़ राज्यात रंगात असताना मध्येच विंगेत घुसून पडदा खाली पाडून स्वतःचे दुसरे नाटय़ त्याच रंगमंचावर घडविण्याची त्यांना इतकी घाई का झाली होती? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. अजित पवार यांना हुंदका फुटला हे खरेच. आम्हीही माणसंच आहोत व आम्हालाही भावना असल्याचे वचन त्यांनी सांगितले. शरद पवारांचे नाव आले म्हणून व्यथित होऊन राजीनामा दिला असेल तर ही व्यथा त्यांनी इतरांना का नाही सांगितली? दुसरे असे की, राजीनाम्याआधी चार दिवसांपासून ते विधानसभा अध्यक्षांच्या संपर्कात होते व त्यांनी राजीनामा देण्याची वेळ नक्की केली होती. जर त्यांनीशरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल तर त्या संघर्षाच्या दिवशी ते पवारांबरोबर कुठेच दिसले नाहीत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते पाहिल्यावर वाटते, ‘‘दादा, कुछ तो गडबड है!’’.