शिवसेना-भाजप चर्चेची पहिली बैठक रद्द; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वतीने खा. संजय राऊत यांची घोषणा

भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये होणारी बैठक शिवसेनेकडून रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर भाजप नेत्यांची तातडीची बैठक पार पडत आहे. या बैठकीस भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

BJP-Shiv Sena Political Battle For Power | (Photo Credits: Facebook)

BJP-Shiv Sena Political Battle For Power: शिवसेना भाजप चर्चेची पहिलीच बैठक रद्द करण्यात आली आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रुमख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वतीने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही माहिती दिली आहे. सत्तावाटप आणि सरकार स्थापनेसाठी चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. उभय पक्षाचे प्रत्येकी दोन नेते या बैठकीत सहभागी होणार होते. 'मुख्यमंत्री पद आणि समसमान सत्तावाटपाचं सूत्र ठरलंच नाही', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर सांगितल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. मख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंर शिवसेनेच्या गोटात तीव्र पडसाद उमटले आहेत. या पडसादांचा पहिला भाग उभय पक्षांची बैठक रद्द होण्यात झाला आहे.

दरम्यान, शिवसेना-भाजप यांच्यात मुख्यमंत्री पद आणि समसमान जागावाटप असा कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट झीडकारले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजपचाच मुख्यमंत्री पाच वर्षे सत्तेत राहील. तसेच, भाजपचे सरकारही पाच वर्षे सत्तेत स्थिर राहील अशा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. तर, सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच असावे असे शिवसेनेला वाटू शकते. मात्र, वाटणे आणि प्रत्यक्षात असणे यात फार फरक आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. (हेही वाचा, 'आमचं ठरलंय' ते आमचं तुटतंय? भाजपच्या फुग्याला शिवसेनेची टाचणी? काँग्रेस, राष्ट्रवादी पाहतंय दुरुन मजा)

एएनआय ट्विट

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजपमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये होणारी बैठक शिवसेनेकडून रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर भाजप नेत्यांची तातडीची बैठक पार पडत आहे. या बैठकीस भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.