कोरोना महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलणार शिंदे सरकार; मंत्री Chandrakant Patil यांची घोषणा
तरुण आणि विद्यार्थ्यांच्या हिताची नुकतीच ही दुसरी मोठी घोषणा आहे. याआधी शिंदे सरकारने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची घोषणा केली होती.
कोरोना (Covid-19) महामारीत आपले पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगितले की, कोविड-19 महामारीमुळे ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले पालक दोघेही गमावले आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी विधानसभेत काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली.
पाटील म्हणाले की, राज्यातील विविध शासकीय महाविद्यालयात 931 पदवीधर आणि 228 पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी कोरोना महामारीच्या काळात आपले दोन्ही पालक गमावले आहेत. त्यांच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे शुल्क सरकार भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला दोन कोटी रुपयांहून अधिक बोजा पडणार असल्याचे सांगून राज्यमंत्री म्हणाले की, आता राज्य सरकारला दरवर्षी असा निर्णय घेण्याची गरज भासणार नाही.
महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून त्यांनी जनहिताचे एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेतले आहेत. तरुण आणि विद्यार्थ्यांच्या हिताची नुकतीच ही दुसरी मोठी घोषणा आहे. याआधी शिंदे सरकारने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारच्या या निर्णयाला अनेक विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. (हेही वाचा: गणेशोत्सवानंतर Uddhav Thackeray यांच्या राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेला सुरुवात; सीएम एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात होणार पहिली सभा)
त्याचवेळी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांबद्दल बोलायचे झाले तर गेल्या दोन दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. मात्र, गेल्या आठवड्यात राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. सोमवारी महाराष्ट्रात 1832 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 818 प्रकरणे एकट्या मुंबईत नोंदवण्यात आली आहेत. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 1000 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळले आहेत.